Rajan Salvi : विधानसभा निवडणुकीतील पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही, आताही मी घाबरत नाही अशा शब्दांत माजी आमदार राजन साळवी यांनी आपण उद्धव ठाकरेंची साथ का सोडली याचं उत्तर दिलं आहे. साळवी यांनी पक्षाचा राजीनामा देण्यास पक्षातीलच लोक कारणीभूत ठरले असाच अर्थ त्यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे. दरम्यान, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचा मुलगा, भाऊ, पुतण्या देखील शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
ठाकरेंना धक्क्यांवर धक्के! दिल्लीतील संमेलनात खासदाराची हजेरी; साळवीनंतर शिंदेंचं दुसरं ऑपरेशन
शिंदे गटात प्रवेश करण्याआधी राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यामुळेच ठाकरेंची शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. साळवी पुढे म्हणाले, गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करत आहे. गेली तीन टर्म आमदार म्हणून काम केलं. पाच वेळेस विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. 2006 मध्ये मी पराभूत झालो. पण 2024 मधील पराभव माझ्या जिव्हारी लागला.
या निवडणुकीत पक्षातील लोकांनीच माझ्याविरुद्ध काम केलं. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली असं माझं ठाम मत झालं. ज्यांच्यामुळे माझा पराभव झाला त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरेंनाही भेटलो. नंतरच्या काळात मी शांत होतो. पण सहकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा विकासाकडे न्यायचा असेल तर मला सत्तेत असलेल्या एखाद्या पक्षात जावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. पक्षचिन्ह आहे. त्यामुळे सर्वांच्या सूचनेनंतर आम्ही शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
विनायक राऊत यांच्याकडे कोकणातील शिवसेनेची जबाबदारी होती. त्यांनी यात लक्ष घालून आतापर्यंत सर्व गोष्टी संपवायला हव्या होत्या. पण यात ते अपयशी ठरले. पराभवाला तेच कारणीभूत असल्याचं मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षांच्या वाटचालीत पक्ष सोडताना नक्कीच माझ्या मनात वेदना आहे दुःख आहे. परंतु, आगामी काळात परिवर्तन यावे यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असे राजन साळवी म्हणाले.
शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?