शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?
![शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय? शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Rajan-Salvi_V_jpg--1280x720-4g.webp)
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाचे ग्रह फिरले आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक गळती ठाकरे गटाला लागली आहे. आताही कोकणात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे एकनिष्ठ मानले जाणारे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनीही उद्धव ठाकरेंची साथ (Uddhav Thackeray) सोडली आहे. राजन साळवी यांचा शिंदेसेनेतील प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून आजच प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पक्ष प्रवेशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) मोठी भूमिका आहे.
कारण, राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी कडाडून विरोध केला होता. काय राजकारण सुरू आहे याचा अंदाज शिंदेंना होताच. त्यामुळे शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला. आता या नेत्यांतील वाद कसा संपुष्टात आला? एकनाथ शिंदेंनी दोघांना काय आश्वासन दिलं? त्यांच्याकडून काय आश्वासन घेतलं याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अखेर राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार
माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. परंतु, त्यांच्या पक्ष प्रवेशाला उदय सामंत आणि किरण सामंत यांचा विरोध होता. त्यामुळे साळवी यांचा पक्षप्रवेश रखडला होता. त्यानंतर हा वाद मिटवून सामोपचार घडवून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. सर्वांची बैठक झाली. बैठकीत वादाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बैठकीत नेमकं काय घडलं?
या बैठकीनंतर किरण सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. साळवी आमच्यासोबत आहेत. उद्याही आमच्यासोबतच राहतील. त्यांना योग्य तो मान आणि सन्मान दिला जाईल. साळवींच्या पक्ष प्रवेशावर या बैठकीत चर्चा झाली. मोठं शक्ति प्रदर्शन होईल. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना काय मिळेल यावर मात्र चर्चा झाली नाही असे किरण सामंत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन साळवी यांच्या पक्षांतर करण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. ठाकरेंचे निष्ठावान म्हणूनच साळवींची ओळख होती. मग असं झालं तरी काय की त्यांना थेट पक्ष सोडण्याचाच निर्णय घ्यावा लागला. पक्षातील स्थानिक नेत्यांशी त्यांचे खटके उडाले होते. यातूनच ते नाराज झाले होते. त्यानंतर साळवींनी शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामाही दिला. आता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन साळवी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती आहे.
कोकणात ठाकरेंना मोठा धक्का! राजन साळवींसह ‘ते’ दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर