Uddhav Thackeray : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देणारी बातमी आली आहे. राज्यात नवीन वर्षाचं सेलीब्रेशन सुरू असताना फटाके मात्र राजकारणात फुटत आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. राजन साळवी मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यामुळे आता ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.
राज अन् उद्धव ठाकरेंची भेट, एकत्र येण्याच्या चर्चा; राऊतांचा एकाच वाक्यात फुलस्टॉप!
निवडणूक काळात आणि त्यानंतर वरिष्ठांनी आपली काहीच दखल घेतली नाही अशी भावना साळवी यांच्या मनात निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची चौकशी झाली होती. आता पुन्हा एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याची चिंता त्यांना सतावत आहेत. त्यामुळे राजन साळवी लवकरच पक्ष सोडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यानंतर आता राजन साळवी भाजपमध्ये जाणार की शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. मात्र जर राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाच तर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. कोकणात शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याचाही धोका आहे. त्यामुळे आता राजन साळवी काय निर्णय घेतात, खरंच ठाकरे गटाची साथ सोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजन साळवी यांनी कालच प्रतिक्रिया दिली होती. मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेली कामं मी आजपर्यंत केली आहेत. त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे असे राजन साळवी म्हणाले होते. परंतु, आता राजन साळवी उद्धव ठाकरेंना लवकरच जय महाराष्ट्र करतील अशा चर्चा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
ACB Raid : अनेक धक्के सहन केलेत, काही फरक पडत नाही; राजन साळवींनी स्पष्ट सांगितलं
कोकणातील शिवसेनेचे एक महत्वाचे म्हणून राजन साळवी ओळखले जातात. नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार त्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते असा मोठा पल्ला त्यांनी गाठला आहे. राज्य सरकारने त्यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेतली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर साळवी प्रचंड नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. परंतु, आता मात्र त्यांची ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचे समजते.