राज अन् उद्धव ठाकरेंची भेट, एकत्र येण्याच्या चर्चा; राऊतांचा एकाच वाक्यात फुलस्टॉप!
Sanjay Raut : मनसे अध्यक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात रविवारी एकत्र आले होते. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूसदेखील सहभागी असतो. राज ठाकरे यांच्यासोबत देखील मी काम केलं आहे. त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहीलं आहे. उद्धव ठाकरे हे देखील माझे भाऊ आणि मित्राप्रमाणे आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे महाराष्ट्राच ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम असल्याचे राऊत म्हणाले.
राज ठाकरेंचे आयडॉल मोदी, शाह अन् फडणवीस
राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे हे भाजपसोबत राहून काम करतात. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे राज यांचे आयडॉल आहेत. पण आमच्या पक्षाचं तसं नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये मराठी माणसांवर अन्याय करण्यामध्ये तसेच शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे अशा व्यक्तींसोबत जाणं महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल.
तुर्तास राजकीय नजरेने पाहू नका
अजित पवार, शरद पवार, रोहित पवार हे एकत्र भेटतात ना. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असले तरीही भाऊ बहिण म्हणून एकत्र येतात. कोकणातले राणे त्यांचा एक मुलगा इकडे तर एक मुलगा तिकडे तरीही कुटुंब एक असतं. उद्धव आणि राज ठाकरे भाऊ आहेत त्यामुळे एकत्र येण्याबाबत घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल असे म्हणत याआधी देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. परंतु कालच्या भेटीकडे सध्या राजकीय नजरेने पाहू नका असे सूचक विधान संजय राऊतांनी केले.
Sanjay Raut on BJP : भाजप म्हणजे बिश्नोई गँग; संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवरून भाजपवर वार
नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात असले तरी दोन्ही नेते कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसतात. हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एकत्र दिसले (Maharashtra Politics) आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसत आहेत. उद्धव फोनवर व्यस्त होते, तर राज ठाकरे त्यांच्या शेजारी उभे होते. दोन्ही भावांमध्ये कितीही राजकीय मतभेद असले तरी ठाकरे घराण्याची ताकद कायम असल्याचे या चित्रावरून दिसून येते. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त रविवारी दोन्ही बंधू एकत्र आले होते.