Vinayak Raut replies Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना (Narayan Rane) उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे विनायक राऊत आहेत. दोघांतील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. आता निवडणुकीतही शाब्दिक टीकेतून हे वैर बाहेर पडू लागलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होऊन सुद्धा राणेंमध्ये चेंबूरच्या नाक्यावरचा नाऱ्या आजही जिवंत आहे अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित (Uddhav Thackeray) राहणार आहेत. त्यामुळे ठाकरेंनी येथे येऊन भाजप नेत्यांवर टीका केली तर त्यांना परत जाण्याचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
Narayan Rane vs Ashok Chavan : 16 वर्षे झाली ‘अशोकाचं झाड’ राणेंचा पिच्छा सोडेना..
राणेंच्या या इशाऱ्याला आम्ही केराची टोपली दाखवतो. पक्षप्रमुखांचा रस्ता अडवणारी औलाद अजून जन्माला आलेली नाही. आलीच तर त्यांनी कोणती जागा दाखवायची याची ताकद शिवसैनिकांत आहे, असा इशारा राऊत यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावर नारायण राणेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या वक्तव्यावर आता नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, या मतदारसंघात महाविकास आघाडीने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीने नारायण राणे यांना तिकीट दिलं आहे. या मतदारसंघावर आधी शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी दावा केला होता. मात्र, भाजपने राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ शिंदेंकडून सोडवून घेतला. येथे राणेंना उमेदवारी दिली. त्यामुळे आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत निश्चित झाली आहे. दोन्हीही नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच आता या दोन्ही उमेदवारांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याने मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालं आहे.
Narayan Rane : माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी !