“सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे का?” असा संतप्त सवाल विचारत शिवसेनेचे (Shivsena) वाघ म्हटले जाणाऱ्या रामदास कदम यांनी महायुतीतील वाद महाराष्ट्रासमोर आणलाय. हा सवाल जरी एका ओळीचा असला तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीमध्ये किती टोकाचे वाद सुरु असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किती जरी सांगत असले की “महायुतीत कोणताही वाद नाही”, तरी रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या या संतप्त सवालाने महायुतीमध्ये वाद आहेत आणि ते कोणत्या मुद्द्यावर आहेत हे आपल्या समजून घेता येऊ शकेल. (Shiv Sena leader Ramdas Kadam has criticized BJP from Ratnagiri Lok Sabha constituency.)
गतवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 आणि शिवसेनेने 23 जागा लढविल्या होत्या. तर काँग्रेसने 25 आणि राष्ट्रवादीने 19 आणि मित्रपक्षांसाठी चार जागा सोडल्या होत्या. निकालावेळी शिवसेनेचे 18 आणि भाजपच्या 23 जागा निवडून आल्या. तिकडे राष्ट्रवादीच्या चार आणि काँग्रेसची एक जागा निवडून आली. पुढे शिवसेनेतील बंडानंतर 18 पैकी 13 खासदार शिंदेंसोबत गेले तर पाच खासदार ठाकरेंसोबत राहिले.
राष्ट्रवादीतील चार पैकी एक खासदार म्हणजे सुनील तटकरे अजितदादांसोबत गेले तर तीन खासदार शरद पवारांसोबत राहिले. आता जे खासदार महायुतीमध्ये आहेत त्यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीने गत निवडणुकीत पराभूत झालेल्या बहुतांश जागांवर भाजपचा डोळा चर्चा आहे. भाजपाला शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही जागा हव्या आहेत. त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचे आणि त्यातूनच वाद सुरु असल्याचे बोलले जाते.
यातीलच एक वादग्रस्त जागा आहे ती रत्नागिरीची.
रत्नागिरी मतदारसंघ मिळावा यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे. इथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजप तिकीट देणार असल्याचे सांगितले जात आहे आणि इथेच रामदास कदम यांच्या रागाचे कारण आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून 2009 चा अपवाद वगळता 1996 पासून शिवसेनेचा खासदार निवडून गेला आहे. सध्या इथले खासदार विनायक राऊत ठाकरे गटात आहेत. पण तरीरी हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे असे रामदास कदम यांचे मत आहे.
यातूनच रामदास कदम म्हणाले, भाजपा रायगड आणि रत्नागिरीच्या जागेसाठी अग्रही आहे म्हणे… तुम्ही रायगडमध्ये सांगाल आम्हीच… उद्या म्हणाल रत्नागिरीतही आम्हीच… त्यामुळे मला त्यांना सांगायचे आहे की, असे होत नसते. रत्नागिरी ही आमची जागा आहे. तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे. त्या जागेवर पूर्णपणे शिवसेनेचा अधिकार आहे. तुम्ही रत्नागिरीची जागा मागाल, रायगडची जागा मागाल, तुम्हाला सर्व पक्षांना संपवून एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? ठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. ती जागा आम्ही लढवणारच. ती आमच्या हक्काची जागा आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले आहे.
वाटाघाटीत ही जागा शिवसेनेकडे कायम राहिली तर मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे. त्यामुळे आता भाजपचा प्रयत्न की रामदास कदमांचा आग्रह नेमके कोण जिंकते ते येत्या काही दिवसांतच संपवून स्पष्ट होईल