Download App

कोकणात उद्धव ठाकरेंची राजकीय परीक्षा; लोकसभेचा पॅटर्न महायुती कायम राखणार?

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता येथे उद्धव ठाकरेंची कोकणातील राजकीय परीक्षा होणार आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी कोकण महत्त्वाचा (Maharashtra Elections 2024) आहे. कोकणात विधानसभेच्या ७५ जागा आहेत. या भागात शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे त्यामुळे येथील लढती कायमच अटीतटीच्या राहिल्या आहेत. परंतु २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता येथे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) राजकीय परीक्षा होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणात (Lok Sabha Elections 2024) महायुतीने महविकास आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या.

कोकणात मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा भाग येतो. एमएमआर हा राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा शहरी भाग आहे. दुसऱ्या भागात बहुतांश ग्रामीण परिसर आहे. या ठिकाणी वीज, पाणी आणि दळणवळणाच्या सुविधांचा फारसा विकास झालेला नाही. बेरोजगारी देखील येथे मोठा मुद्दा आहे. येथे प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड परियोजना हा देखील एक मोठा मुद्दा आहे. महायुती सरकार ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे तर ठाकरे गट मात्र या प्रकल्पाचा विरोध करणाऱ्यांसोबत आहे.

मराठी माणसाच्या मुद्यावर वाढला प्रभाव

१९८० च्या दशकात कोकण काँग्रेसचा (Congress Party) बालेकिल्ला होता. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणूस आणि भूमिपुत्र असा नारा दिल्यानंतर कोकणातील राजकारणच बदलून गेलं. नारायण राणे शिवसेना (Narayan Rane) सोडून गेल्यानंतरही येथे शिवसेनेला चांगला पाठिंबा मिळत राहिला. परंतु आता पक्षात फूट पडलेली असताना पुन्हा मोठा विजय मिळवता येईल का हा मोठा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टातील ‘त्या’ याचिकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर..

२०१९ मध्ये काय होते निकाल

२०१९ मधील निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने कोकणात २९ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने २७ जागा जिंकण्यात यश मिळवल होतं. शिवसेना-भाजप युती असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला येथे यश मिळवता आलं नव्हतं. या निकालांवरून स्पष्ट होतं की कोकणात शिवसेना भाजप युती शक्तिशाली होती. पण आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि उद्धव ठाकरे भाजपपासून दूर गेल्यानंतर होत असलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदार कुणाला साथ देतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

कोकणात महायुतीला साथ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात दमदार कामगिरी केली. महायुतीला मोठा धक्का बसला होता. परंतु कोकणात मात्र महायुती आघाडीवर राहिली. येथील १२ जागांपैकी ७ जागा महायुतीने तर ५ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. आता या निकालांचा विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर असे लक्षात येते की महायुतीला येथील ४८ मतदारसंघांत आघाडी मिळाली होती. तर मविआ २७ मतदारसंघांत आघाडीवर राहिली.

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली, ब्रिगेड जरांगेंना साथ देणार?

मातब्बर नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

कोकणात पुन्हा शिवसेना उभी करण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. कारण पक्षात फूट पडल्यानंतर येथील अनेक दिग्गज आणि चांगला जनाधार असणारे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे येथे नेतृत्व उभे करणे ठाकरेंसाठी अवघड ठरत आहे. शिवसेना फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरे भाजपवर आजही करत असतात. लोकसभा निवडणुकीत याचा त्यांना फायदा देखील मिळाला. दुसरीकडे एकनाथ शिंदे त्यांच्याच पक्षाला खरी शिवसेना असल्याचे सांगत आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर पक्ष वाटचाल करत असल्याचा दावा शिंदे सातत्याने करत आहेत.

भाजप सुद्धा या भागात चांगलीच मेहनत करत आहे. खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत रत्नागिरीतील मतदारसंघांतून निवडणूक लढणार आहेत. याशिवाय ठाणे शहरातील शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होताना दिसणार आहे.

follow us