Download App

पडताळणीनंतर ‘त्या’ 26 लाख लाभार्थ्यांचं काय होणार? निर्णय कोण घेणार.. मंत्री तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांचं काय होणार, याचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे.

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षभरानंतरही योजना व्यवस्थित सुरू असून महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होत आहेत. मात्र दुसरीकडे या योजनेत अनेक गैरप्रकारही उघडकीस आले. चक्क पुरूषांनीच योजनेचा लाभ घेतला. तर कुठे सरकारी कर्मचारी महिला देखील लाडक्या झाल्या. त्यामुळे ही योजना वादात सापडली. यातच माहिती तंत्रज्ञान विभागाकडून 26 लाख लाभार्थ्यांचा डाटा मिळाला होता. या लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरावर पाठवून पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांचं काय होणार, याचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी (Aditi Tatkare) दिलं आहे.

राज्यातील 26 लाख लाभार्थ्यांचा डेटा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळाला आहे. स्क्रुटिनीचे काम सुरू आहे. 35 ते 40 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. यानंतर याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. महिला बालकल्याण विभागाकडे अन्य विभागांचा डेटा अॅक्सेस करण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे या विभागांना विनंती करून (Ladki Bahin Yojana) त्यांच्याकडून डेटा घ्यावा लागतो. आता अन्न व नागरी पुरवठा विभागासह सर्व विभागांकडून माहिती मिळाली आहे.

मोठी बातमी! 27 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू, याद्या मिळाल्या; ‘या’ गोष्टींची तपासणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील

26 लाख लाभार्थ्यांची माहिती ही साधारण माहिती  (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) आहे. एखाद्या महिलेचं बँकेत खातं नाही म्हणून तिने घरातील एखाद्या सदस्याचा खाते नंबर दिलेला असू शकतो. या गोष्टीची खात्री करण्याची गरज आहे. आता आमचं 35 ते 40 टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरित काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर परिस्थिती लक्षात येईल. या योजनेत काही सरकारी कर्मचारी महिलांनी देखील लाभ घेतला आहे. आता या महिलांकडून चलनाच्या माध्यमातून पैसे पुन्हा घेतले जाणार आहेत. 26 लाख लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

योजनेत अडीच कोटींपेक्षा जास्त नोंदणी

दरम्यान, 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा झाली होती. त्यानंतर 1 जुलै 2024 पासून नोंदणीला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत 2 कोटी 63 लाखांहून अधिक महिलांनी या योजनेत नावनोंदणी केली होती अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

लाडकी बहीण योजना : सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये

follow us