Legislative Council election results today : गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. राज्यातील 17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 6 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 11 मतदारसंघांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेच्या या लढतीत अनेक ठिकाणी बंडखोरी, नाराजी आणि अपक्ष उमेदवारांनीही समीकरणं बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने जाणार, याचा फैसला आज होणार आहे.
जागावाटपापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या नाट्यमय घडामोडींपर्यंत विधान परिषद निवडणुका यंदा चांगल्याच गाजल्या. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडीनं सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मविआच्या आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. दरम्यान, ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
या सहा जागांचा निकाल आधीच लागल्यानंतर आता सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या 11 मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. नाशिक आणि भंडारा-गोंदिया येथे शंभर टक्के मतदान झाले, तर सांगली-साताऱ्यात 99.89 टक्के, परभणी-हिंगोलीत 99.78 टक्के, सोलापुरात 99.68 टक्के, धाराशिव-लातूर-बीडमध्ये 99.49 टक्के आणि छत्रपती संभाजीनगर-जालना येथे 98.90 टक्के मतदानाची नोंद झाली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; दुचाकी-पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू
राज्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना असला तरी काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत आहे. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि बंडखोर रेश्मा काळे यांच्यात तिरंगी संघर्ष आहे. सांगली-साताऱ्यात भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत रंगली आहे. नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे रामदास पाटील आमनेसामने आहेत. तर नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट सामना होत आहे.
नागपूरच्या पोटनिवडणुकीकडे विशेष लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात एकूण 836 मतदार असून त्यापैकी 823 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विजयी उमेदवारासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा 412 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. महायुतीकडे कागदोपत्री सुमारे 579 मतांचं संख्याबळ असल्याचं मानलं जात आहे, तर महाविकास आघाडीकडे सुमारे 211 मतं आहेत. त्यामुळे नागपुरात भाजपचे पारडे जड मानले जात असले तरी अपक्षांच्या मतांमुळे अंतिम निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.
एकूणच, बंडखोरी, नाराजी, अपक्षांचे आव्हान आणि महायुती-महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेची लढत अशा सर्व घडामोडींनंतर आजच्या निकालांमधून महाराष्ट्रातील स्थानिक राजकीय समीकरणांचा नेमका कल स्पष्ट होणार आहे. विधान परिषद निवडणुकांचे हे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरते मर्यादित नसून आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारे मानले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागलं आहे.
