शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 16.96 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

News Photo   2026 07 28T215041.681

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 16.96 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक (Farmer) अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण योजनेसाठी ₹36,585 कोटींचा खर्च अपेक्षित असून, नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने ₹20,000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

दरम्यान, सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाची माहिती देत 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. या टप्प्यात एकूण ₹13,600 कोटींची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सहा जिल्ह्यांत एक लाखांहून अधिक लाभार्थी

सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या माहितीनुसार, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये एक लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 1,32,634 शेतकरी लाभार्थी आहेत. जालना जिल्ह्यात 1.60 लाख, बुलढाणा जिल्ह्यात 1.16 लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1.05 लाख, तर यवतमाळ जिल्ह्यात 1.01 लाख लाभार्थी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी 3,708 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

तावरे यांनी सांगितले की, दुसरी लाभार्थी यादी पुढील दोन आठवड्यांत जाहीर केली जाईल, तसेच संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.

कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळणार

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज सरसकट माफ करण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कर्जमाफीच्या यादीवर शेतकऱ्यांचा आक्षेप

दरम्यान, कर्जमाफीच्या लाभार्थी यादीबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील गंधोरा गावात 233 शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे नमूद असले, तरी त्यापैकी सुमारे 80 टक्के शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत गोंधळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी बँकेच्या पासबुकच्या आधारे माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

दोन लाखांपर्यंतचे कर्ज असल्यास घाईने परतफेड करू नका

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, दोन लाख रुपयांपर्यंतचे पात्र कर्ज असल्यास शेतकऱ्यांनी घाईघाईने कर्जाची परतफेड करू नये. अशा शेतकऱ्यांना बँकांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही. एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीत नसल्यास किंवा लाभ नाकारला गेल्यास त्यामागे कागदपत्रांतील त्रुटी असू शकतात. अशा प्रकरणांची पडताळणी करून पुढील याद्यांमध्ये त्यांचा समावेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून, उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही दत्तात्रय भरणे यांनी केले.

Exit mobile version