Download App

शिंदे मुंबईत धुरळा उडवणार! मराठमोळ्या कलाकारांची पॉलिटक्समध्ये एन्ट्री; कुणाचं नाव चर्चेत?

Lok Sabha Election : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी किंवा आमदारकी मिळवतात तेव्हाही त्यांचं ग्लॅमर असतं पण ते राजकारणी म्हणून. त्यांच्या याच ग्लॅमरचा फायदा राजकीय पक्ष घेतात अन् त्यांना उमेदवारी देतात. यातील काही स्टार्स हिट होतात तर काहींच्या नशिबी माती येते. पण, हा फैसला हार जीतवर असतो. आताही लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राजकीय पक्ष उमेदवारांच्या शोधात आहेत. अभिनेत्यांकडेही त्यांचे लक्ष आहेच. निवडणूक जिंकणारा हुकूमी एक्का म्हणून अभिनेत्यांना रिंगणात उतरवण्याचे नियोजन सुरू आहेत.या राजकारणात भाजप तर आहेच पण एकनाथ शिंदेही मागे नाहीत. त्यांच्याकडून उमेदवारीसाठी काही अभिनेत्यांचा विचार सुरू आहे. हे अभिनेते कोण आहेत याची माहिती घेऊ या..

Lok Sabha Election : राजकारणातील स्टार्स! काहींचं ‘पॉलिटिक्स’ हिट तर काहींचं करिअरच ‘ब्रेक’

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत आहे. महायुतीमधील घटक पक्षांत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. प्रबळ उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. शिंदे गटाकडून मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काही अभिनेत्यांची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या रिंगणात मराठमोळे कलाकार दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ, वायव्य मुंबई मतदारसंघात कोणता चेहरा योग्य ठरेल याचा सर्व्हे शिंदे गटाने केला आहे. सध्या मराठी सिनेअभिनेते शरद पोंक्षे, सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर यांच्या नावांची चाचपणी सुरू आहे. शरद पोंक्षे प्रखर हिंदुत्वाची भूमिका जोरकसपणे मांडतात. त्यामुळे त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, वायव्य मुंबई मतदारसंघासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम यांना संधी मिळणार याचा निर्णय अजून बाकी आहे.

सचिन खेडेकर आणि सचिन पिळगांवकर हे दोन अभिनेत मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतही झळकले आहेत. सचिन खेडेकर यांनी तर दाक्षिणात्य चित्रपटांतही अभिनयाचा शिक्का उमटवला. त्यामुळे हे दोन्ही अभिनेते मुंबईतील हिंदी भाषिकांच्याही परिचयाचे आहेत. अशा परिस्थितीत या अभिनेत्यांबाबत मराठी जनतेचं काय मत आहे याचा अंदाज शिंदे गटाकडून घेतला जात आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता गोविंदानेही काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सहाजिकच तिकीट मिळण्याच्या उद्देशानेच हा पक्ष प्रवेश झाला. वायव्य मुंबई मतदारसंघातून गोविंदाला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याआधी गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत भाजप नेते राम नाईक यांचा पराभव केला होते. मागच्या टर्ममध्ये मात्र गोविंदा राजकारणातूनच गायब झाला होता. परंतु, आता गोविंदा पुन्हा राजकारणात परतला आहे. एकनाथ शिंदे त्याला उमेदवारी देतील की नाही हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. एकूणच यंदाही निवडणुकीच्या आखाड्यात मोठ्या पडद्यावरील अभिनेते दिसतील एवढं मात्र नक्की.

follow us