Download App

पियूष गोयल लोकसभा लढणार; भाजपाच्या प्लॅनिंगने मुंबईतील विद्यमान खासदारांना धडकी

Lok Sabha Elections 2024 : राज्यसभेच्या खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवून राज्यसभेत (Lok Sabha 2024) नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असं भाजपाचं प्लॅनिंग आहे. त्यासाठी भाजपाने तयारीही सुरू केली आहे. राज्यसभेचे खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) देखील लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची शोधाशोध सुरू झाली आहे. भाजप गोयल यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट देणार आणि त्यांच्या एन्ट्रीने कुणाचा पत्ता कट होणार याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. तरी देखील या बातमीने मुंबईतील (Mumbai) भाजपाच्या विद्यमान खासदारांना धडकी भरली आहे.

पियूष गोयल 2010 पासून राज्यसभेचे खासदार आहेत. सलग तीन वेळा त्यांनी महाराष्ट्रातून खासदार (Maharashtra) होण्याची किमया साधली आहे. आता लोकसभेत नशीब आजमावण्याची त्यांची तयारी सुरू आहे. गोयल यांना मुंबईतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. मध्य उत्तर मुंबई किंवा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघांचा विचार केला तर मध्य उत्तर मुंबईत पूनम महाजन (Poonam Mahajan) आणि उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी (Gopal Shetti) विद्यमान खासदार आहेत.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा

आता या दोन्हींपैकी एका मतदारसंघातून गोयल यांना तिकीट दिले गेले तर एकाचा पत्ता कट होणार आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल 4 लाख 65 हजार मतांनी पराभव केला होता. तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव केला होता. या दोन्ही नेत्यांची खासदारकीची दुसरी टर्म आहे. आधी या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे खासदार होते.

या दोन्ही मतदारसंघांपैकी गोयल यांना कोणत्या मतदारसंघांतून तिकीट द्यायचे याची चाचपणी वरिष्ठांकडून केली जात आहे. गोयल मोदी सरकारमधील मंत्री आहेत. त्यांच्याकडे वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा अशी महत्वाची खाती आहेत. आता त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे. त्यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट मिळणार, कोणत्या खासदाराचा पत्ता कट होणार, या खासदारांचे पक्ष पुनर्वसन कशा पद्धतीने करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nashik Loksabha : ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी | LetsUpp Marathi

भाजपाचा मतदारसंघात सर्वे सुरू 

लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असला पाहिजे यासाठी भाजपने एक सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी चार कंपन्यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठी कोणते मतदारसंघ सुरक्षित असतील याचीही माहिती घेतली जात आहे. याबरोबरच पक्षाच्या खासदारांची मतदारसंघातील कामगिरीचीही माहिती घेतली जात आहे.

follow us