Download App

टेन्शन वाढलं! पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच लम्पीचा प्रादुर्भाव, अधिकाऱ्याच्या निलंबनासह बैलगाडा शर्यतीवर बंदी

Lumpy In Ahilyanagar Bullock Cart Racing Banned : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar News) लम्पी या गोवंशीय जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघातच या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर पहायला मिळत आहे. लम्पी आजाराने राहता तालुक्यासह नेवासा तालुक्यात थैमान घातले आहे. तर कामकाजातील हलगर्जीपणामुळे राहत्याच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सद्या लम्पी (Lumpy) आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशू संवर्धन कार्यालयाने कंबर कसली आहे.

21 जुलै रोजी लम्पी आजाराच्या पहिला रिपोर्ट आला होता. त्यानंतर आजपर्यंत तब्बल 556 गोवंशीय जनावरे बाधित झाली. यामध्ये 268 जनावरे आजारातून बरे झाले आहे, तर आतापर्यंत 26 जनावरे लम्पी आजारामुळे दगावली आहेत. यामध्ये सद्या 262 जनावरे ऍक्टिव जनावरे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 126 गावांमध्ये ही जनावरे आढळून आली. 103 ठिकाणे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात राहत्यात 143, नेवाश्यात 109 तर कोपरगाव 68, कर्जत 53, राहुरी 52, संगमनेर 64 तालुक्यात प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर नगर 0, अकोले 5, जामखेड 5, पारनेर 29, पाथर्डी 0, शेवगाव 10, श्रीगोंदा 10 तर श्रीरामपूर तालुक्यात 08 गोवंशीय जनावरे बाधित आढळून आली आहेत. यामध्ये सध्या 262 जनावरे ऍक्टिव्ह असून 267 जनावरे आजारातून बरे झाले आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव वाढताच जिल्हा प्रशासनाकडून तपासणी पथके रवाना केली आहेत.

Malegaon Blast : भागवतांना अडकवा, मृत लोकांना शोधा; निकालानंतर माजी ATS अधिकाऱ्याचे दावे

अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई

तालुक्यामध्ये प्रभावीपणे लसीकरण तसेच जनावरांची योग्य ती काळजी लम्पीचा प्रादुर्भाव दिसूनही उपायोजना वेळेत उपायोजना न केल्याने पालकमंत्री विखे यांच्या मतदारसंघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लम्पी हा विषाणूजन्य आजार असून अवकाळी पाऊस, डास, गोचीड, गोमाशी, खराब चारा – पाणी, गोठ्यातील अस्वच्छता यांमुळे लॅम्पीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा स्वच्छता, धूर फवारणी, निर्जंतुकीकरण यांवर भर देऊन जनावरे राहण्याची ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजे. तसेच ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे, त्यांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवून इतर जनावरे बाधित होण्यापासून रोखले पाहिजे. असे जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी

दरम्यान वाढत्या लम्पी आजारामुळे जिल्ह्यातील राळेगण थेरपाळ तसेच टाकळी ढोकेश्वर येथे होणारे बैलगाडा शर्यतीला परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात देखील पुढील आदेशापर्यंत बैल गाडा शर्यतीला बंदी घालण्यात आली आहे. तसेच विनापरवानगी बैलगाडा शर्यत भरविल्यास कारवाई करणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे डॉ. पाटील यांनी बैलगाडा मालकांना लम्पी बाधित क्षेत्रात आपली गोवंशीय जनावरे नेऊ नये असे आवाहन केले आहे.

ब्रेकिंग! ट्रम्पचा दणका तुर्तास टळला; भारताला टॅरिफसाठी 7 दिवसांची सूट

लसीकरणाची जबाबदारी कोणाकडे?

जिल्ह्यात भटके, विनावारस गोवंशीय जनावरांची संख्या देखील मोठी असून या जनावरांच्या देखभालीची व्यवस्था कोणाकडे नसल्याने यातील काही भटक्या गोवंशीय जनावरांना लम्पी बाधला तर तो जनावर स्प्रेडरचे काम करू शकतो. त्यामुळे त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील भटक्या गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घेण्याची विनंती पशु संवर्धन कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

 

follow us