Ambadas Danve : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल सुनावला. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नैतिकता नाही का, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला याचा कोणताही पश्चाताप होत नाही, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळ त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.
CAT ने निलंबन रद्द केलंय, परमबीर सिंग यांच्या निलंबनावर फडणवीस म्हणाले…
ते म्हणाले, फडणवीस यांनी रात्री तीन वाजता राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. पहाटे केलेला शपथविधी ही कोणती नैतिकता होती, याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे. जम्मू काश्मिरात मेहबूबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन केले. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार यांच्याबरोबरही सरकार स्थापन केले. मग ही कोणती नैतिकता होती असा सवाल करत भाजपने आम्हाला नैतिकता शिकविण्याची गरज नाही,अशा शब्दांत दानवे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.
काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आहे. राज्यपालांनी त्या काळात घेतलेले निर्णय चुकीचे होते हे ही कोर्टाने सांगितले. जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत निकाल ऐकून राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, असा टोला दानवे यांनी लगावला.
योग्य वेळी निर्णय होईल – फडणवीस
दरम्यान, फडणवीस म्हणाले, न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यासाठी वेळही सांगण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर स्पीकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते फ्री अँड फेअर प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडतील. सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे जे कायद्यात आणि संविधानात आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करतील.