Prakash Ambedkar on OBC Reservation : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वार वाहतय. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणुकांची धामधूम असताना वंचित बहुजन आघाडीचे (Prakash Ambedkar ) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आता प्रकाश आंबेडकरांनी रुग्णालयातूनच आपल्या मतदारांना संदेश दिला आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे. त्यांनी मतदारांना बोलताना, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलं आहे. निवडणुकीलाही सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठीही महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; छातीत दुखत असल्यामुळे रूग्णालयात दाखल
आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपलं बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहं आहे. ते हॉस्पिटलमध्ये दाखल असून, आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.
जबाबदारी महत्त्वाची
दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचवण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, अशी सादही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला घातली आहे.