Anuradha Nagwade : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. (Anuradha Nagwade) नगर जिल्ह्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ अनुराधा नागवडे यांच्या गळ्यात पडली आहे. उमेदवारी ‘फायनल‘ होताच अनुराधा नागवडे प्रचारात अग्रेसर झाल्या आहेत.
अनुराधा नागवडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत तालुक्यात प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. श्रीगोंद्यातील सहकार क्षेत्रात शिवाजीराव नागवडेंचा मोठा वारसा असलेल्या नागवडे कुटुंबाला अनेकदा आमदारकीने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कुठल्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा चंग बांधत नागवडे कुटुंबीय विधानसभेच्या रणांगणात उतरले आहे.
स्वतः अनुराधा नागवडेंसह त्यांचे पती राजेंद्र नागवडेंनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा-नगर विधानसभा क्षेत्रातील गावोगाव पिंजून काढले आहे. त्यांना मतदारांचादेखील मोठा प्रतिसाद मिळत असून, गावोगावचे कार्यकर्ते देखील सक्रीय झाले आहेत.
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडेंना तिकीट
नागवडेंच्या तुलनेत तालुक्यातील इतर नेते मात्र उमेदवारीबाबत संभ्रमावस्थेत असल्यामुळे त्यांचा प्रचार थंडावला आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्या यादीतच जाहीर झाली आहे. परंतु, त्यांच्या ऐवजी महायुतीकडून त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्या आग्रही असल्याचं समजते.
दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली असून, त्यांची भूमिका माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट होईल. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले अण्णा शेलार हे परंपरेप्रमाणे माघार घेतील, अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर व्हिडीओद्वारे अफवांवर विश्वास न ठेवू नका, असं जाहीर करण्याची नामुष्की ओढावली आहे. घनःशाम शेलार यांची भूमिका देखील गुलदस्त्यात आहे.
या सर्व नेत्यांच्या संदिग्धतेमध्ये अनुराधा नागवडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शिवाजीराव नागवडे यांना मानणारे गावोगावचे जुने कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्ते यांची मोट बांधल्यामुळे नागवडे प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र सध्या श्रीगोंद्यात दिसत आहे. त्यात संपूर्ण नागवडे कुटुंबीयांनी प्रचारात स्वतःला झोकून दिल्यामुळे सर्व स्तरातून त्यांना पाठींबा मिळत आहे. तथापि अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी इतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.