Maharashtra Assembly Session : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे विरोधकांचं संख्याबळ कमी झालं असलं तरी विरोधक आक्रमक दिसत आहेत. आजच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली. त्यासाठी निमित्त ठरले एप्रिल महिन्यात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे.
त्याचं झालं असं, चव्हाण यांनी याच मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नुसतीच समिती नेमली. मुदतवाढ संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली. शासन आदेश काढला. आयोग नेमला. याद्वारे कुणाला तरी संरक्षण देण्याचा प्रयत्न कसा केला जात आहे हे मी दाखवणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
20 एप्रिलच्या जीआरला एक महिन्याची मुदत होती. ती 20 मे रोजीच संपली. त्यानंतर कार्यकक्षा ठरविण्याचा दुसरा जीआर काढण्यात आला. 13 जुलैला पुन्हा जीआर काढून या आयोगाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. इतके दिवस हा आयोग काय करत होता?, आयोगामध्ये खरंच काही चौकशी करण्याची इच्छा आहे का?, हा आदेश कुणी दिला?, यामध्ये काही राजकीय व्यक्तींचे संरक्षण करण्याचा उद्देश होता का?, अधिकाऱ्यांनी कुणाच्या राजकीय दबावाखाली येत दुपारची वेळ ठरवली का?, असे सवाल त्यांनी केले.
आयोगात असे काही मुद्दे टाकले आहेत की ज्यात दोषी कोण आहेत याबद्दल अवाक्षरही नाही. या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तर केली आहेच मात्र त्याआधी या घटनेची चौकशी होऊन दोषी कोण आहेत, ते समोर आले पाहिजे असे चव्हाण म्हणाले.
त्यावर मंत्री मुनगंटीवार म्हणााले, पृथ्वीराज चव्हाण अतिशय अनुभवी आहेत. स्थगन प्रस्ताव ज्यावेळी असतो तो त्या काळातील घटनांबद्दल असावा असे अपेक्षित आहे. यावर तारांकीत प्रश्न आहे. लक्षवेधी आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना झालेल्या घटनांचीही माहिती आपण देऊ. म्हणजे काय प्रक्रिया आहे हे तुमच्या लक्षात येईल. मुदतवाढ का दिली हे सांगायला नको का काय बोलताय असे त्यांनी म्हणताच गदारोळ वाढला.
CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा
त्यानंतर मुनगंटीवार यांनी विरोधकांचा गोंधळ चूक असल्याचे सांगत तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळणार नाही असे सांगितले. तरीही गोंधळ वाढलेलाच होता. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर हस्तक्षेप करत विरोधकांना म्हटले की मंत्र्यांकडे कोणती खाती आहेत हे आधी समजून घ्या. मुनगंटीवार सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत मग त्यांनीच उत्तर दिले पाहिजे असे म्हणत सुनील केदार यांना खाली बसण्यास सांगितले.
पुढे मुनगंटीवार म्हणाले, त्यांनी मुदतवाढीत राजकारण केलं. उत्तर देताना मात्र अशा पद्धतीनं उठायचं ऐकायचं नाही. सहनशीलता वाढवा. इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने राजकारण करू नये. समितीची कार्यकक्षा, कार्यकाळ का वाढविला त्याचे उत्तर आपण उद्या देणार आहोतच. पण तुमच्या काळात कार्यकाळ जितक्या वेळेला वाढविला त्यामागे जी कारणे होती तीच आताही आहेत. पृथ्वीराजजी आमचे मित्र आहेत त्यांनी विनाकारण प्रेशर घेऊ नये असे उत्तर मुनगंटीवार यांनी दिले.