Bachchu kadu : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
कडू म्हणाले, की ‘आम्ही सध्या तरी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती करायची की नाही करायची, किती जागा देणार नाही देणार हे अजून काही ठरलेले नाही. बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य अधिकृत आहे की अनधिकृत आहे किंवा ते चुकून तसे बोलले हे सुद्धा तपासले पाहिजे,’ असे स्पष्ट करत दीड वर्षात पुढे काय होते ते आताच सांगता येणार नाही असे कडू म्हणाले.
काही झाले तरी 125 पेक्षा कमी जागा नाहीच; आमदार गायकवाडांनी ठणकावले..
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार आहे, तर शिंदे गटाला 48 जागा देणार असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, सध्या तरी आम्ही शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचे अजून काही ठरले नाही ते आता पुढे पाहू. दीड वर्षात काय होईल काही सांगता येत नाही. या पाच वर्षात तीन वेळा मुख्यमंत्री बदलले त्यामुळे पुढील दीड वर्षात यात आणखीही काही बदल होऊ शकतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
खबरदार, बाळासाहेबांबद्दल बोलाल तर.. ‘त्या’ प्रश्नावर आमदार संजय शिरसाट संतापले
दरम्यान, याआधी आमदार संजय शिरसाट यांनीही बावनकुळे यांना सुनावले होते. ते म्हणाले, की बावनकुळेंच्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी बावनकुळेंना सुनावले. असे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येतो याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. 48 जागा लढवणारे आम्ही मुर्ख आहोत का, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.