Download App

..अन्यथा ‘उबाठा’चं भरकटलेलं यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाने सामनातून केलेल्या या टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटावर टीका करणारं एक खोचक ट्विट केलं आहे. ‘ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहिमेवरून पंतप्रधान मोदीजी यांच्यावर टीका करत आहेत. करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं आश्चर्य नाही.’

‘तुम्ही अक्कल तरी वापरा’; बावनकुळेंशी संबंधित ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार संतापले

‘संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंद यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही.’

‘कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फटडणवसांनी जपानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल’, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले आहे.

ठाकरे गटाची टीका नेमकी काय ?

मिशन मूननंतर मिशन सन, मिशन शुक्र अशा नवनवीन स्वप्नांचा भूलभूलैया जनतेला गुंतवित आहे. मिशन सन वगैरे ठीक आहे पण, सध्या भरकटलेले कांद्याचे यान देखील नीट लँड होणे तेवढेच महत्वाचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने यान जरूर सोडा पण, आधी कांद्याचे यान लँड करा! नाहीतर 2024 मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही, अशी टीका आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Tags

follow us