Maharashtra Budget 2025-26 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवार (दि. 10 मार्च)रोजी दुपारी २ वाजता राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मंत्री पवार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. (Budget) तसंच, काही नव्या धोरणांचीही माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली.
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली.
स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.
येथील इतिहास
रत्नागिरी जिल्ह्यात कसबा पेठ संगमेश्वर अशी ओळख असलेले गाव. येथे स्वराज्याचे रक्षक छ. संभाजी महाराज यांना फंद फितुरीने कैद करण्यात आले होते. या गावात संगमेश्वर अन् चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर ही प्राचीन मंदिरे कोकण भूमीला इतिहासाची सुंदर किनार प्रदान करतात. याच गावात ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘कसबा संगमेश्वर’ कोकणाला सुंदर वलय प्राप्त करून देतात. याच संगमेश्वरला ‘देवळांचे गाव’ असेही म्हटलं जातं. कसबा, कर्णेश्वर, सप्तेश्वर अशा ठिकाणांना तुम्ही आवर्जुन भेट द्या.
संगमेश्वर
संगमेश्वर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई – गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेनेदेखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते.