Download App

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव नाकारला, संतप्त विरोधकांनी केला सभात्याग

Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा चांगलाच गाजला.  या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. मेंढ्या, पाळीव प्राणीही दगावले. नुकसान पाहून शेतकरी स्वतःलाच मारून घेत आहे. दुसरीकडे पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावले उचलावीत. शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

वाचा : Mangaldas Bandal : अजित पवारांनी शब्द दिला, पण पाळलाच नाही!

राज्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. कांदा, कापूस, मका, हरभरा, गहू अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. आणखीही काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो?

अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला. त्याच्या संसाराची होळी झाली आहे. आणि इकडे नेते रंग उधळत आहे असा टोला छगन भुजबळ यांनी लावत गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही अनुदानाच्या बाबत निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी गुजरातच्या सरकारचा संदर्भ दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या मुद्द्यावर सरकारला घेरले. त्यानंतर याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली. यापेक्षा जास्त महत्वाचे दुसरे काही असू शकत नाही असे स्पष्ट करत त्यांनी ही मागणी लावून धरली. मात्र, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे जयंत पाटील संतप्त झाले.  आम्हाला जर बोलूच दिले जात नसेल तर काय उपयोग, असा सवाल करत सभात्याग केला.

Tags

follow us