Download App

मोठी बातमी! विधानपरिषदेच्या ‘त्या’ 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान

विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Elections 2024 : विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Elections 2024) करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेल्या विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मंगळवारी 25 जून रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर 3 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतदान झाल्यानंतर याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.

विधानपरिषदेसाठी ठाकरेंचं ठरलं! विश्वासू नेत्याला पुन्हा संधी; दोन जागांसाठी उमेदवार जाहीर

‘या’ सदस्यांचा कार्यकाळ संपणार

विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेले 11 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. यामध्ये डॉ. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला खान दुरानी, निलय नाईक, अॅड. अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष) यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या जागी नव्याने सदस्य निवडले जाणार असून यासाठी निवडणूक होत आहे.

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर, नाशिक आणि मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. यानंतर लगेचच ही निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुतीची पिछेहाट झाल्याने त्यांच्या गोटात काळजीचं वातावरण आहे.

या धक्क्यातून सावरत असतानाच या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यानंतर थोड्याच दिवसांत राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी दोन्ही आघाड्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडतील.

महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?

 

follow us