Rajgad Cooperative Sugar Factory : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनंत नगर निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या (Rajgad Cooperative Sugar Factory) खेळत्या भांडवलासाठी 402 कोटी 90 कोटी रुपये मार्जिन मनी कर्जाच्या प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. राजगड सहकारी साखर कारखान्याने खेळत्या भांडवलासाठी सादर केलेल्या 499 कोटी 15 लाख रुपयाच्या मार्जिन मनी कर्ज मागणीतील 402 कोटी 90 लाख रुपयांच्या कर्जास मान्यता देण्यात आली. या प्रस्तावामध्ये साखर प्रकल्पा आधुनिकीकरण व विस्तारिकरण, आसवणी प्रकल्प उभारणी, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायो सी बी जी प्रकल्प उभारणीसाठी 327 कोटी 25 लाख रुपये, विविध बँकांच्या कर्ज परतफेडीकरीता 67 कोटी 23 लाख रुपये, यंत्र सामुग्री दुरुस्ती आणि देखभाल खर्च भागविण्यासाठी 8 कोटी 42 लाख रुपयांचा समावेश आहे.
मार्जिन मनी लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापुर्वी राजगडसाखर कारखान्याने केंद्र सरकारकडून प्रकल्प विस्तारी करणासाठी आवश्यक असणारी मंजुरी घ्यावी. तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून पुर्व परवानगी घ्यावी. त्याच बरोबर 25 जून, 2025 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करावे, या अटींवर कारखान्या प्रस्तावावर मान्यता देण्यात आली आहे. त्याच बरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास 39 कोटी 88 लाख रुपयांचे मुदत कर्ज राज्य सहकारी बँकेकडून घेण्यास मान्यता देण्यात आली. या कर्जास कारखान्याचे संचालक मंडळास वैयक्तिक आणि सामूहिक रित्या जबाबदार असेल, कर्ज वितरणापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी अशा अटीसह शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आली.
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 99 एकर 27 आर जमीन विक्रीस देखील आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना उपबाजार आवाराकरीता खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी ॲक्ट नुसार यशवंत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना पुन्हा सुरु करता यावा यासाठी कारखान्याच्या 26 फेब्रुवारी, 2025 रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना विक्री करावी आणि विविध बँका, कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शासकीय देणी भागवावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखान्याची जमीन रेडी रेकनर दरानुसार 231 कोटी 25 लाख रुपयांना विक्री करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी यशवंत सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कार्यवाही करावी. मात्र जमीनीचा वापर उपबाजारासाठीच करावा. या जमीनीची विक्री अथवा इतर कोणत्याही अन्य वापरासाठी करता येणार नाही. अशी अट घालण्यात आली आहे.