Tajpur Landslide : राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणासह मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटना ताजी असतानाच काल रात्री अलिबाग तालुक्यातील ताजपूर येथे मोठी दरड कोसळली.
दरड कोसळण्याच्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनातील अधिकारी खडबडून जागे झाले अन् त्यांनी तडक घटनास्थळ गाठले. येथील परिस्थितीची पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीविताहानी झाली नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे मात्र नुकसान झाले आहे. यानंतर अलिबागच्या तहसीलदारांनी गावाला भेट देत पाहणी केली.
LetsUpp Special : पवार पुन्हा भिजणार की ठाकरे डरकाळी फोडणार ?
या गावात जवळपास शंभर घरे आहेत. डोंगरावरील या गावाला दरडींचा धोक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने येथील 29 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या उद्देशाने नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पावसाची परिस्थिती पाहून प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नद्यांना पूर आला होता. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.