Download App

ठाकरे, पवारांबद्दल जनमानसात सहानुभूती पण.., छगन भुजबळांच्या वक्तव्याने आश्चर्य

राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल

Chhagan Bhujbal Comment on Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या दोन्ही पक्षांतील एक-एक गट सत्तेत सहभागी झाला. या राजकारणाच्या जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण झाल्याची चर्चा होती. आज याच चर्चांवर खुद्द राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनीच (Chhagan Bhujbal) शिक्कामोर्तब केलं. राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

भुजबळांविरोधातील ईडीची याचिका मागे; उद्धव ठाकरे म्हणाले, कोणता चमत्कार केला?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनमानसात सहानुभूती आहे. त्यांच्याप्रती असलेली सहानुभूतीची लाट त्यांच्या भाषणांसाठी होत असलेल्या गर्दीवरून दिसून येते. पण तरीही लोकांचा विश्वास नरेंद्र मोदींवर आहे. देशात एक मजबूत सरकार असावं अशी लोकांची इच्छा असल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळे लोक मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तिसऱ्यांदा एक मजबूत सरकार निवडून देतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Election) लढतीवर भाष्य केले. माझ्यासाठी हा प्रकार दुःखद होता. एका कुटु्ंबात वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर असं काही होत असेल हे अनेकांना पटलेलं नाही. चूक कुणाची हा भाग नंतरचा पण असं घडलच नसतं तर जास्त चांगलं झालं असतं असं मला वाटतं.

नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Election) मी तिकीट मागितलंच नव्हतं. वरिष्ठांकडूनच माझं नाव सुचवण्यात आलं होतं. त्यानंतर मी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. परंतु, नाशिकमधील उमेदवारी काही केल्या जाहीर होत नव्हती त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतली. कारण तिकीटासाठी रडणारा मी नाही. मुंबई महापालिकेसाठी एकदाच बाळासाहेबांकडे तिकीट मागितले होते. यानंतर कोणत्याही निवडणुकीसाठी परत तिकीट मागण्याची वेळ माझ्यावर आली नाही असे छगन भुजबळ म्हणाले.

नाशिक लोकसभेबाबत छगन भुजबळांचं मोठ विधान! म्हणाले, राष्ट्रवादीचा दावा आजही…

संविधान बदलण्यासाठी भाजपला 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत असा प्रचार विरोधकांकडू केला जात आहे. या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, संविधान सशक्त आहे. यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा सांगितलं आहे. तरी देखील विरोधकांकडून प्रचार केला जात आहे. याचे काय परिणाम होतील हे निवडणूक निकालाच्या दिवशीच समजेल.

follow us