Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपानंतर उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. निवडणुका म्हटल्या की नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर काही नवीन नाही. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. राजकीय पक्षांचे फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघात या दलबदलू उमेदवारांवर अवलंबून आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गटाला एकूण दहा जागा मिळाल्या आहेत. यातील पाच मतदारसंघात पक्षाने बाहेरून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवर निवडणूक लढत आहे. यातील दोन मतदारसंघात पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब कमालीचे नाराज झाले होते. त्यांची वाढती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर मागील आठवड्यात मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत महाविकास आघाडीकडून तिकीटही मिळवले.
Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z
पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके आधी अजित पवार गटात होते. त्यांनीही निवडणुकीची तयारी केली होती. परंतु महायुतीने सुजय विखेंनाच पुन्हा तिकीट दिल्याने पक्ष बदलण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा काहीच पर्याय नव्हता. तरीदेखील निर्णय घेण्यासाठी त्यांनी बरेच दिवस वेळ घेतला. अखेर सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या पहिल्याच यादीत लंके यांचं नाव होतं.
जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघातील निवडणूक चर्चेत आहे. या मतदारसंघात भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांनाच तिकीट दिले. त्यामुळे रक्षा खडसे यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर होता. त्यांनी तातडीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे या दोघांनाही उमेदवारीबाबत विचारणा केली. परंतु दोघांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला. आता तर एकनाथ खडसे केव्हाही भाजपात वापसी करतील अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या होत्या. अखेर पक्षाने भाजपातून आलेल्या श्रीराम पाटील यांची उमेदवारी नक्की केली.
लोकसभा निवडणुकीआधी बीड मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपने येथे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले. पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नावे महाविकास आघाडीसमोर होती. शरद पवार गटाने येथे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली. निवडणुकीआधी सोनवणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सोनवणे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. परंतु महायुतीकडून तिकीट मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी पक्ष बदलत उमेदवारी सुद्धा पक्की केली.
काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अमर काळे वर्धा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. सन १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते.
शिरूर मतदारसंघात शरद पवारांनी पुन्हा अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी दिली. आता अमोल कोल्हे यांच्यासमोर तितक्याच ताकदीचा उमेदवार पाहिजे होता. पण अजित पवार गटाकडे तसा उमेदवार नव्हता. आढळराव पाटील हे एकच नाव त्यांच्यासमोर होते. पण आढळराव शिंदे गटात होते. मग काय खुद्द अजितदादांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यात आढळरावांनी हातात घड्याळ बांधलं. आता महायुतीचे उमेदवार म्हणून ते शिरूरच्या निवडणुकीत आहेत. दलबदलू उमेदवारांचा इतिहास पाहिला तर १९८० च्या निवडणुकीत या उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.