Chhagan Bhujbal : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Manoj Jarange) होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर साधारण अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या विधेयकात मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण टिकावं यासाठीच विधेयक तयार करण्यात आलं आहे, असे भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.
जे काही बिल तयार केलं आहे ते अजून आमच्या हातात आलेलं नाही. सगेसोयऱ्यांच्या संदर्भात साडेसहा लाख हरकती नोंदवल्या आहेत. समता परिषद, ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांचं मी यासाठी अभिनंदन करतो. त्यांनी ज्या हरकती गोळा केल्या आहेत आता या हरकतींचा अभ्यास करावा लागेल असे भुजबळ म्हणाले.
यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही भाष्य केले. सरकारला जर सगळंच मनोज जरांगे पाटील यांचं ऐकायचं असेल आणि 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचं असेल तर मग वेगळा कायदा करण्याची तरी काय गरज? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. सरकार वेगळा कायदा करत आहे याचाच अर्थ सरकार मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे. याआधी गायकवाड कमिशनने जो अहवाल दिला होता त्यावर जो कायदा करण्यात आला तो उच्च न्यायालयात टिकला. पुढे सर्वोच्च न्यायालयात त्यात काही त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न माजी न्यायाधीशांनी केला आहे. त्यामुळे आता आरक्षण टिकेल असं वाटतं असंही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
जातनिहाय जनगणना करा
बाठिया आयोगाने केलेली जनगणना असेल किंवा शुक्रे कमिशनने केलेली जनगणना असेल या कोणत्याच आयोगाची जनगणना आम्हाला मान्य नाही. जर खरंच कुठला समाज किती आहे याची माहिती हवी असेल तर आधी जातीय जनगणना करा, अशी मागणी भुजबळ यांनी यावेळी केली. आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, याबाबत मला अद्याप काहीच माहिती नाही. जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील तितक्याच जागा आम्हाला देखील मिळाल्या पाहिजेत.