Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाचे नेतेही प्रतिक्रिया देत आहेत. अजित पवार गटाचे नेते तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही भाष्य केले आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. भुजबळ, मुंडे आणि इतर अनेक देखील तुमचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेच आहेत. आम्ही त्यांना जाऊन भेटलो आहोत. पक्षात फूट पडली नाही असे ते म्हणत आहेत, मग आता त्यांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे, असे भुजबळ म्हणाले.
धनंजय मुंडेंची सुप्त इच्छ पूर्ण; पवारांचं विधान म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद
नाफेडच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. आज संध्याकाळपर्यंत नाफेडचे 32 केंद्र नाशिकमध्ये सुरू होणार आहेत. आज लिलाव सुरू झाले आहेत. 2100 ते 2200 रुपये भाव मिळत आहे. 2 लाख मेट्रिक केंद्र कांदा खरेदी करायचा आहे तर नाफेडकडून केंद्र वाढवावे लागतील असे मी सांगितले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होतं आहे याचं आम्हाला दुःख आहे.नुकसान कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे भुजबळ म्हणाले.
मुंडे म्हणाले, शरद पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे आम्हाला आमच्या देवाचा मिळालेला आशीर्वादच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेला जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. हे आम्ही आधी देखील म्हणालो होतो. त्यानुसार लोकशाही मार्गानेच आम्ही ही भूमिका स्वीकारली आहे. आता शरद पवार यांनीही आम्हाला पाठिंबा दिला असे वाटते. या माध्यमातून आम्हाला आमच्या देवाचाच आशीर्वाद भेटला.
हा तर देवानेच आम्हाला आशीर्वाद दिला आहे. शरद पवारांच्या वक्तव्याचा हाच अर्थ आहे. चांगलं काम करणाऱ्या माणसाला पाठिबा द्या अशी विनंती आम्ही पवार साहेबांना आम्ही आधीपासूनच करत होतो, असे वक्तव्य मंत्री मुंडे यांनी केले. मुंडेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाला शरद पवार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा तर नाही ना अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.