ठराविक लोकांनी टार्गेट केलं, आता पक्षश्रेष्ठींनी मला… आ. तांबेंनी दिले घरवापसीचे संकेत
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या अनपेक्षित घडामोडीनंतर काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित करण्यात आलेले आ. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. तांबे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले.
काँग्रेसकडून आपल्याला काही संपर्क साधण्यात आला का? किंवा कुणाशी काही चर्चा झाली का? असा प्रश्न तांबेंना विचारला. ‘काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललेलं आहे. त्यांनी जरी आम्हाला ढकलून दिलं असलं तरी आमच्या रक्तात काँग्रेस आहे. आमच्या विचारात काँग्रेस आहे. 2030 मध्ये माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु काही लोकांनी जर बाहेर ढकलून दिलं असेल तर मला असं वाटतं की ही पक्षश्रेष्ठींचीच जबाबदारी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी बोलावलं पाहिजे. पण, अद्याप अशी कोणतीच हालचाल झालेली नाही’, असे आ. तांबे यांनी स्पष्ट केले.
‘काही लोकांची पावलं NDA च्या दिशेने?’ पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री सामंतांना वेगळाच संशय
ठराविक लोकांनी चांगल्या कार्यकर्त्यांना टार्गेट करणं ही चिंतेची बाब
ते पुढे म्हणाले, ‘नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. कशा पद्धतीने माझ्या बाबतीत राजकारण झालं, कशा पद्धतीने पक्षातून बाहेर ढकलण्यात आलं. मीच एकटा नाही तर या देशात जे चांगले काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना ठराविक ठिकाणी टार्गेट करून ज्या पद्धतीने बाहेर ढकलण्यात आले ती मोठी चिंतेची बाब आहे. यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता तांबे म्हणाले, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. किती लोकांवर कारवाई करायची किती जणांवर नाही करायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याने मी त्यावर काहीच टीप्पणी करणार नाही.
नाशिक पदवीधर निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं ?
काँग्रेसने सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी अर्जच दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षाकडून दोघांवरही कारवाई करण्यात आली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झाले होते. यानंतर आता तांबे यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.