Sunil Tatkare : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे.
या निवडीनंतर राजकीय वर्तळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली मात्र विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रसामाध्यमांशी बोलणे टाळले. मात्र ट्विट करत त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर अजित पवार नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या त्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांचे संघटन कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशात आणि राज्यात आधिक बळकट करण्यास उपयुक्त ठरेल. संघटनेत विस्तार आपण देशपातळवर करण्याचा विचार करतो अशा वेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा ४० वर्षांचा अनुभव आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचीही लोकसभा आणि राज्यसभेत प्रभावी कामगिरी राहिली आहे, त्यामुळे त्यांचेही राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व आहे. या दोघांच्या नियुक्तीने पक्षाच्या भविव्याला अधिक बळकटी मिळेल.
अजित पवार प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले त्यामुळे ते नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर तटकरे म्हणाले, अजित पवार यांच्या मनात काहीही नाही. ते सुद्धा या कार्यक्रमात होते. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी पक्ष अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी अजित दादा कायमच सक्रिय राहिले आहेत. भविष्यात त्यांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात एक नंबरचे स्थान मिळवेल.
अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर
अजित पवार नाराज असण्याचे काहीच कारण नाही. ते लगेच निघून गेले असे काही नाही. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया द्यायला मिळते अशातला काही भाग नाही, असे तटकरे म्हणाले.
दरम्यान, याआधी मुंबईत वर्धापनदिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतनिधींनी याबाबत अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली होती. पण त्याठिकाणी ढोल ताशांचा आवाज सुरू होता. त्यामुळे त्यांनी बोलणे टाळले. त्यानंतर ते आपल्या कारमधून तेथून निघून गेले. त्यांच्या या कृतीनंतर अजित पवार पुन्हा नाराज झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.