Download App

अजितदादा बोलले पण, भुजबळांनीच प्रदेशाध्यक्षपदावर ठोकला दावा; सांगितला ‘हा’ फॉर्म्युला

Chagan Bhujbal : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत खांदेपालटांच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. या घडामोडींवर आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही भाष्य केले असून त्यांच्या वक्तव्यातून प्रदेशाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असून अप्रत्यक्षपणे त्यांनी या पदावर दावा ठोकल्याचे स्पष्ट होत आहे.

भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आधी काँग्रेसमध्ये असे व्हायचे की विधिमंडळ पक्षाचा नेता किंवा मुख्यमंत्री जर बहुसंख्य समाजाचा असेल तर पक्षाचे अध्यक्षपद हे नेहमी दुसऱ्या समाजाच्या नेत्यांकडे जायचे. त्यामुळे आपण ज्यावेळी ओबीसी,ओबीसी म्हणतो. त्यावेळी मला असं वाटतं की ओबीसींबद्दल नुसतेच बोलून चालणार नाही तर महत्वाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहेत. म्हणजे तटकरे आहेत धनंजय मुंडे आहेत जितेंद्र आव्हाड आहेत मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करीन, अशा शब्दांत भुजबळ यांनी आपणही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले.

PM Modi US Visit : ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो म्हणजे काय?; PM मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, जाणून घ्या कारण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. काल त्यांनी जाहीर कार्यक्रमातही तसे सांगितले होते. पक्षात संघटनेच्या निवडणुका सुरू असताना अध्यक्ष बदलण्याची मागणी झाली तर त्यात वावगे नाही, असे काही नेत्यांचे मत आहे.

राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर एका समाजाची व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्षपदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी, अशी आमची मागणी आहे. ही आमची सूचना आहे, असे भुजबळ म्हणाले.

केसरकरांचा आणखी एक गौप्यस्फोट; म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पद..

काय म्हणाले होते अजित पवार?

मी इतके वर्ष विविध पदांवर काम केले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले आहे. ते सांभाळत असताना काहींचे म्हणणे आहे तू कडक वागत नाहीस. आता म्हटले त्यांची गचांडी धरू की काय संघटनेची जबाबदारी द्या आणि पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केली.

Tags

follow us