अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांंच्या गोटात गेलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोन दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत तेथे नव्याने तयार करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर सह्या करत पाठिंबा जाहीर केला. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार आपले दैवत असल्याचे म्हणत लहामटे यांनी आपण त्यांच्या सोबतच राहणार असल्याचे सांगितले होते. (MLA Dr. Kiran Lahamte has announced his support to Deputy Chief Minister Ajit Pawar within two days)
दरम्यान, दोन दिवसात अशा काय घडामोडी घडल्या की आमदार लहामटे यांनी आपली भूमिका बदलली असा सवाल आता विचारला जात आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आहे, बाळासाहेब जगताप.
अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा आमदार लहामटे हे राजभवनात उपस्थित होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर त्यांनी सह्या देखील केल्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी लहामटे शरद पवार यांच्याकडे परतले. शपथविधीपूर्वी पार पडलेल्या बैठकीत आपल्या फसवून सह्या घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे, असं म्हणतं त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं.
मात्र आपल्या गोटातून निसटून गेलेल्या लहामटे यांना परत आणण्याचा चंग अजितदादांनी बांधला. अजित दादांनी ही जबाबदारी अहमदनगरच्या विळदमधील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप यांच्यावर सोपविली. जगताप यांनीही तडक अकोले गाठले. लहामटे यांच्याशी संपर्क सुरु केला, त्यांची समजूत काढली. मात्र लहामटे काही भूमिका बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे जगताप अकोल्यातच तळ ठोकून थांबले.
जगताप यांचा तगादा पाहून लहामटे त्यांना टाळत होते. एवढेच काय, त्यांची भेट आणि संवादही ते टाळू लागले. याशिवाय घरी न थांबता अज्ञात ठिकाणी निघून गेले. मात्र जगताप यांनी लहामटेंना तिथेही गाठले आणि अजित पवार यांचा निरोप पोहचवला. जगताप त्यांना घेऊन रात्रीच मुंबईला रवाना झाले. मध्यरात्रीच्या सुमारात त्यांची अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. अकोल्यात काय विकास कामे करायची, याचा आराखडा तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले. काही कागदपत्रांवर आता लहामटे यांनी सह्या केल्या असून ते कायदेशीररित्या अजित पवार यांच्या गटात गेल्याचे सांगितले जात आहे.
किरण लहामटे हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार आहे. 2019 साली त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता. ते सुरुवातीपासूनच अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र अकोला मतदारसंघात शरद पवारांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर हे अजितदादा गटाचे मानले जातात. आपल्या मतदारसंघातील जनमानस आणि स्थानिक राजकारण बघता लहामटे यांनी शरद पवारांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते.