Download App

‘आज या दारात.. उद्या त्या दारात.. लोकांना काय तोंड दाखवणार?’ रोहित पवारांनी बंडखोरांना फटकारलं!

Maharashtra Political Crisis : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळत आहे. या राजकीय संघर्षात आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या अजित पवारांसह अन्य आमदारांना चांगलंच फटकारलं आहे.

आज या दारात… उद्या त्या दारात… पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल. मग लोकांना काय सांगणार? तोंड कसं दाखवणार? काल तर कडवा विरोध होता.. मग आज अचानक गळ्यात गळा कसा? तो कोणता गळ आहे… ज्या गळाला लागला मासा! तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं? रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं? अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार? किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?

जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा.. आता कुणाकडून करायची जनतेने आशा? भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा.. कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा.. इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत… स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.

कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा? निर्लज्जपणाचा झाला कळस… तुम्हाला येत नाही याची किळस? आता तुम्हीच उठा… अन मैदानात उतरा… शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ.. त्यात माझेही असतील दोन हात.. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांना चांगलेच खडसावले आहे.

मनावर दगड ठेवून निलेश लंकेंनी निर्णय घेतला… अजितदादांच्या गोटात दाखल

दरम्यान, आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेते बैठका घेणार असून, या बैठकांकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू झाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या अध्यक्षतेतही बैठक होत असून या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार पोहोचत आहेत. या बैठकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us