Download App

Maharashtra Politics : इर्शाळवाडी, मुंबई अन् रात्रीतून गाठली दिल्ली; शिंदेंच्या दौऱ्याने पुन्हा राजकीय भूकंप?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातून आताच्या घडीला एक महत्वाची बातमी समोर आली आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेची माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री अचानक दिल्ली गाठली. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू असतानाच शिंदे यांचा दिल्ली दौरा संभाव्य खळबळजनक राजकीय घडामोडींचे संकेत देत आहे.

मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा नियोजित नाही. ते अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या सर्व घटनांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा राजकारणात चर्चेचा ठरत आहे.

‘मी आधीच सांगितलं होतं की, अजितदादा लवकरच’.. राऊतांनी शिंदे गटाला दिला खोचक सल्ला

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा नियोजित नाही. ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेले आहेत. येथे ते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. याआधी शिंदे 18 जुलै रोजी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर उपमुथख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. येथे भाजपाच्या नेत्यांनी दोघांनाही मान दिला. त्यानंतर मात्र अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर बैठकही घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे या बैठकीचीही बरीच चर्चा झाली होती.

शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावर काही चर्चा होईल का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Irshalwadi : अजितदादा, फडणवीसांच्या पावलावर ठाकरेंचे पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

इर्शाळवाडीत शिंदेंनी केला मुक्काम

दरम्यान, याआधी बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यतील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच गुरुवारी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गावात दाखल झाले. गाव दुर्गम भागात असल्याने जाण्यासाठी रस्ताच नव्हता. वाहने डोंगराखालीच होती. त्यामुळे जवळपास दीड किलोमीटर चिखलाने भरलेली पायवाट तुडवत शिंदे या गावात पोहोचले. संकटग्रस्त लोकांचे तसेच मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. सरकारी मदतीची घोषणाही केली. घटनेची तीव्रता पाहता स्वतः  एक दिवस गावात मुक्काम केला. बचावकार्यात सहभागी झाले. सरकारी यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

मुंबईत आले, फडणवीसांना शुभेच्छा दिल्या

त्यानंतर मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हजेरी लावली.  त्याआधी त्यांनी भाजप कार्यालयात येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काल अधिवेशनात इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर काल रात्रीच अचानक दिल्लीला रवाना झाले. शिंदे यांचा दिल्ली दौरा नियोजित नव्हता. वैयक्तिक कारणांसाठी त्यांना दिल्लीला जावे लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us