Download App

‘असा कृषीमंत्री मिळाला हे आपलं भाग्यच’.. मंत्री सत्तारांच्या रात्रीच्या दौऱ्यावर आव्हाडांचा खोचक टोला..

Jitendra Awhad : अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. या पीक नुकसानीचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही चांगलाच गाजला. अद्यापही बहुतांश भागात पंचनामे झालेले नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी रात्रीच्या वेळी नाशिक जिल्ह्यात अवकाळी नुकसानीचा दौरा केला. येथे त्यांना शेतकऱ्यांचा रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता विरोधकांनीही त्यांना घेरले आहे.

कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, सत्तारांना रात्रीच्या वेळी जास्त दिसतं. त्यामुळे त्यांनी रात्रीची पाहणी केली. रात्रीचं दिसणारा माणूस राज्याचा कृषीमंत्री आहे, हे आपलं भाग्य आहे असा खोचक टोला त्यांनी सत्तारांना लगावला.

हे वाचा : Jitendra Awhad : सीएमसाठी आम्ही त्याला अंगावर घेतलंय; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

राज्यात आतापर्यंत 1 लाख 39 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा असून दोन दिवसांत वस्तूनिष्ठ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची माहिती मिळेल. नुकसानग्रस्त शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन मंत्री सत्तार यांनी दिले.

राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अवकाळा पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एकीकडे राज्यात गुढीपाडव्याचा सण साजरा होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा रब्बीच्या पिकांना बसला आहे. काढणीला आलेला गहू अक्षरशः भुईसपाट झाल होता. यापूर्वी अतिवृष्टीने राज्यातील खरिप पिकांचं नुकसान केलं तर आता अवकाळी पावसाने रब्बीच्या पीकांचंही मोठं नुकसान केल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

Jitendra Awhad : ठाण्यात फडणवीस नव्हे तर, शिंदेचं गृहमंत्री; आव्हाडांचा हल्लाबोल

.. तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान  

मनसेचा (MNS) आज मोठा मेळावा होत आहे. या मेळाव्यानिमित्त मनसेने जय्यत तयारी केली आहे. या मोर्चाला हजारो मनसैनिक येणार असल्याचे सांगितले जात आहे. वातावरण निर्मिती करण्यासाठी परिसरात बॅनर्स, मोठे कटआऊट्सही लावण्यात आले आहेत. यातील काही फलकांवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री.. राज ठाकरे, असं लिहीलं आहे. त्यावरून आव्हाड यांनी टोला हाणला आहे. ‘राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे.’ असा टोला आव्हाड यांनी लगावला.

Tags

follow us