Download App

“आमचे कार्यकर्ते फोडले जात असतील तर मला”.. वडिलांनंतर योगेश कदमही भाजपवर चिडले

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा इशारा शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला होता. यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनीही भाजपवर आगपाखड केली आहे. आमचेच कार्यकर्ते फोडले जात असतील तर मलाही नाईलाजाने तशी पावले उचलावी लागतील असा स्पष्ट इशारा योगेश कदम यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ऐन निवडणुकीच्या आधी महायुतीत धुसफूस वाढली आहे.

कदम पुढे म्हणाले,  मागच्या वेळेला आम्ही अनंत गीते यांचे सुद्धा काम केले होते. योगेश कदम नसता तर अनंत गीते यांना दापोली मतदारसंघातून मते मिळाली नसती. अनेक गावांमध्ये अनंत गीते यांच्याबाबतीत प्रचंड नाराजी होती. आजपर्यंत कुणबी समाज म्हणून त्यांनी निवडणूका लढवल्या आहेत विकास त्यांनी काहीही केला नाही. कोणालाही रोजगार उपलब्ध करुन दिले नाहीत.

Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, अन्यथा… रामदास कदमांच्या वक्तव्याने महायुतीत ठिणगी

15 वर्षे केंद्रामध्ये मंत्री असतानाही एकही उद्योग रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही. काही गावांमध्ये फक्त त्यांनी समाजमंदिरे बांधली आहेत आणि आता ती ओस पडली आहेत. मागच्या लोकसभेत त्यांनी जनतेचे उत्तर मिळाले आहे त्यांना जर पुन्हा पडायचे असेल तर त्यांनी उभे रहावे. दापोली मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला कमीतकमी 55 ते 60 हजार मते आम्ही मिळवून देऊ, असेही कदम यांनी सांगितले.

प्रत्येकाला आपल्या पक्षाचे काम करण्याचा अधिकार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. ज्यावेळी त्यांनी सभा घेतली तेव्हा तिथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे प्रवेश झाले, तर अशा गोष्टी घडायला नको होत्या. जेव्हा आपण एकत्र काम करतो आहोत अशावेळी आमचेच कार्यकर्ते फोडायला लागले तर मला देखील काही पावले उचलावी लागतील असा इशारा योगेश कदम यांनी दिला. याबाबत आता देवेंद्र फाडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.

भाजपनं डाव बदलला; अमित शाहंच्या दौऱ्यानंतर पंकजा मुंडे अन् गडकरींचं नाव पुन्हा रेसमध्ये…

निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी करणे हा त्यांचा अधिकार आहे. सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत आणि सत्तेत विद्यमान खासदाराला तिकिट दिले जाते हे आजपर्यंत घडत आले आहे. ३० वर्षे या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार होते त्यांना पराभूत करुन सुनील तटकरे येथे निवडून आले आहेत. इतिहास पाहिला तर येथे शिवसेना किंवा राष्ट्रवादीचाच खासदार राहिलेला आहे. प्रमोद सावंत यांनी येथे येऊन सभा घेतली पण त्यावेळी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश घेतलेले मला पटलेले नाही.

follow us