Download App

महायुतीचं जागावाटप ठरलं? भाजप 31 तर शिवसेना-राष्ट्रवादीसाठी नवा फॉर्म्युला

Maharashtra Politics : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. काही जागांवर तिढा (Maharashtra Politics) निर्माण झाला आहे तर घटकपक्षांना मनासारख्या जागा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. राज्यात भाजप नेत्यांनी 34 ते 35 जागा आपल्याकडे घ्या असा हट्ट धरला आहे. मात्र या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सन्मानजनक जागा मिळण्यासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळे भाजप 31, शिवसेना 12 ते 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 असा नवा फॉर्म्युला आकारास येत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत जागावाटपावर अंतिम निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे.

महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? अजितदादांनी सांगितला खास फॉर्म्युला

शिवसेनेने जास्त जागा मागण्याऐवजी हमखास जिंकल्या जाणाऱ्या जागांची मागणी करावी असे भाजप नेत्यांनी सांगितले आहे. तरीही शिवसेनेकडून 13 जागांचा आग्रह धरला जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा दिल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. आता यातील बारामतीची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाईल. उर्वरित 24 जागांतून मित्रपक्षांना काही जागा द्याव्या लागतील.

अजितदादांच्या राष्ट्रवादीला ‘या’ जागा फिक्स  

राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती, शिरुर, रायगड आणि परभणी या चार जागा मिळतील हे नक्की आहे. बारामतीत सुनेत्रा पवार, रायगडमध्ये सुनील तटकरे आणि परभणीत राजेश विटेकर या उमेदवारांना तिकीट दिले जाईल असे सांगण्यात येत आहे. या जागावाटपात भाजप मात्र धक्कातंत्राचा वापर करणार असंच दिसत आहे. काही विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळणार नाही, अशी दाट शक्यता आहे. शिंदे गटातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांची धाकधूक वाढली आहे.

Lok Sabha Election : महायुतीत धक्कातंत्र? 12 खासदारांना दणका, 8 भाजप उमेदवारांची यादी ‘रेडी’

मुंबईत भाजपा मोठा भाऊ; सर्वाधिक जागा लढणार 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 31, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांवर उमेदवार देणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती, शिरुर, रायगड आणि परभणी या जागा देण्यात आल्या आहेत. तर 13 जागा शिवसेनेला मिळतील. त्याबदल्यात मुंबईतील 5 जागांवर भाजपाचे उमेदवार असतील असे सांगण्यात येत आहे. शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबईऐवजी ठाण्याची जागा निवडली आहे. दक्षिण मध्य मुंबईतही शिवसेनेचा उमेदवार असेल असे सांगण्यात येत आहे.

follow us