Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच पुन्हा (Maharashtra Politics) फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नऊ जागा निवडून आल्या. यानंतर विधानसभेची तयारी सुरू केलेली असतानाच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा (Eknath Shinde) झेंडा हाती घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मुंदडा चार वेळेस निवडून आले होते. सरकारमध्ये त्यांनी सहकार राज्यमंत्री म्हणून कामही केले होते. हिंगोलीत त्यांची ताकद मोठी आहे. आता मुंदडा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मराठवाड्यात शिंदेसेनेचं बळ वाढलं आहे. मुंदडा मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज होते. पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र ठाकरेंकडून यावर गांभीर्याने विचार झाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीतही पदाधिकाऱ्यांन ऐकलं नाही. उद्धव ठाकरेंनीही विश्वासात घेतलं नाही आणि परस्पर उमेदवार जाहीर केल्याचे मुंदडा म्हणाले.
आषाढीवारीत सहभागी दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
पक्षात कुणीच ऐकून घेत नसल्याने पक्षाच्या या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे मुंदडा यांनी सांगितले. मुंदडा यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाने मराठवाड्यात ताकद वाढणार आहे. मुंदडा हे जुने नेते आहेत. चार वेळचे आमदार आहेत. मंत्रिपदाचाही अनुभव त्यांना आहे. हिंगोलीत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना मुंदडांची मदत होऊ शकते असे सांगितले जात आहे.
उमेदवार बदलण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा डाव फसला; हिंगोलीकरांची ठाकरे गटाला आघाडी
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंगोलीत शिंदे गटात बरेच राजकीय नाट्य घडले होते. शिंदे गटाने थेट विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली. तसंच, हेमंत पाटील नाराज होऊ नयेत, म्हणून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळमधून उमेदवारी देऊन दुहेरी वाद ओढवून घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा हा डाव फसला आणि मतदारसंघातील चित्रच बदलून गेलं. परंतु, महायुतीची भक्कम ताकद, बाबूराव कदम यांच्या रूपाने नवा चेहरा दिल्याने या महायुतीच्या जमेच्या बाजू समजल्या जात होत्या. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. हिंगोलीत शिंदेंचे सगळेच डावपेच फसले.