Download App

धमकीकडे दुर्लक्ष करू नका, कठोर कारवाई करा; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरवरून आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. पवार यांना मिळालेल्या या धमकीचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनेच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले, पवार साहेबांनी तुमचा दाभोलकर करू ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्य शासनाने ही बाब अत्यंत गांभीर्याने घ्यावं आणि पवार साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करावी. सोशल मीडियावर आलेल्या या धमकीकडे कुणीही दुर्लक्ष करू नये. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. काही घडलं तर याला गृहखातच जबाबदार असेल.

‘हा तर सरकारपुरस्कृत दहशतवाद’; धमक्यांनंतर राऊतांचा सरकारवर घणाघात

दरम्यान, विधानपरिषदेतील आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शरद पवार जेव्हा विरोधात असतात तेव्हाच दंगली घडतात असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर पाटील यांनी सडकून टीका केली. या राज्यात दंगली घडवल्या तर कुणाचा फायदा होतो, हे जगजाहीर आहे. लोकप्रियता कमी झाल्यामुळे ती सावरण्यासाठी काही लोक असे वक्तव्य करत आहेत. पण, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या मार्गाने जाणारा पक्ष नाही.

शरद पवारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार – शिंदे 

दरम्यान, या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीर दखल घेतली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटले.

Tags

follow us