Download App

‘आमच्या पक्षात आम्ही सगळेच मंत्री’; नाराजीच्या चर्चांवर शिंदे गटाच्या मंत्र्याचं मिश्कील उत्तर

Maharashtra Politics : सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा वारंवार समोर येत आहे. आमदारांनीही तशाच पद्धतीची वक्तव्ये केल्याने या चर्चात तथ्य असल्याचेही जाणवू लागले आहे. ज्या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकारमध्ये एन्ट्री घेतली त्या दिवसापासून शिंदे गटातील आमदारांचा अविर्भाव पूर्ण बदलून गेला आहे. त्यामुळे आमच्यात कोणीही नाराज नाही, असे सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागत आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे.

‘नीलमताई, माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग अन् कफल्लक’; अंधारेंचा गोऱ्हेंवर घणाघात

शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री देसाई यांना प्रश्न विचारला. त्यावर देसाई म्हणाले, माझा चेहरा पहा किती फ्रेश आहे. मी तुम्हाला नाराज दिसतोय का, आमच्या पक्षात बिलकूल नाराजी नाही. ज्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही ते देखील नाराज नाहीत. उलट आम्हा सगळ्यांना, सर्व 50 आमदारांना वाटतं की आम्ही सगळेच मंत्री आहोत. आम्ही आमच्या माना मुख्यमंत्री शिंदे यांच्या भक्कम खांद्यावर ठेवल्या आहेत. तो खांदा खूप मजबूत आहे. अजित पवार यांनी शपथ घेण्याआधी महायुतीत नऊ पक्ष होते. त्यात आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे.

नाराज कडूंना मोठी जबाबदारी – बावनकुळे 

दरम्यान,  शिंदे गटातील आमदार भरत गोगावले, बच्चू कडू यांसह अन्य काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या आमदारांनी तसे बोलूनही दाखवले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले होते, की नाराज वगैरे कुणीही नसतं. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते आता नाहीत. त्यांना तिथं जे स्थान नव्हतं ते येथे आहे. त्यांच्याच म्हणण्यावर राज्य सरकारने दिव्यांगांसाठी अनेक निर्णय घेतले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी नक्कीच देतील, असे बावनकुळे म्हणाले होते.

Tags

follow us