Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सुरू झालेल्या पावसाने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतजमिनींवरचे पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा गंभीर इशारा देत पुढील 25 तास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याने उत्तर कोकण आणि घाटमाथा परिसरात (Maharashtra Rain) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि (Rain Alert) आहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उशिरा रात्री राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदत आणि पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईत रविवारी रात्री मुसळधार पावसाचा जोर होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण आहे. तरीही हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे.
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात पावसाने खरीप हंगामात मोठं नुकसान केलं आहे. देवळेगव्हाण परिसरातील 12 ते 13 शेतकऱ्यांच्या जवळपास 80 ते 90 एकर ऊसाचे पीक जमीनदोस्त झालं आहे. गाडेगव्हाण, बुटखेडा, लोणगाव या गावांमध्येही पावसामुळे शेतजमिनींवर हानी झाली आहे. काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र अजूनही तशीच कायम आहे.