Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबईच्या उपसागरात झालेली चक्रीय स्थिती आणि मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यांमुळे कोकण आणि मुंबई परिसरात तुफान पाऊस होत आहे. इतकेच नाही मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात तर आभाळचं फाटलं आहे. या बेसुमार पावसाने नद्यांना पूर आला आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ओढे नाले वेगाने वाहत आहेत. तसेच लोक पाणी ओसरण्याची वाट पाहत घरांच्या छतांवर उभे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात तब्बल 231 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येथे इतका पाऊस पडला की बचावकार्य करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. जिल्ह्यातील अनंतवाडी-आनंदनगर येथील 60 घरांना पुराच्या पाण्याने वेढा टाकला होता. यात 43 लोक अडकले होते. हिवरा खडका दरम्यान असलेल्या नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. अमरावती जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आल्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिलेसह तीन जण पाण्यात वाहून गेले. यातील तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले.
यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन नागरिकांचे स्थालांतर
अकोला जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी मुसळधार पावसाने थैमान घातले. मोर्णा, विद्रुपा नदीला पूर आला. पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा, अकोट तालुक्यांतील गावांना बसला आहे. तेल्हाऱ्यात अतिवृष्टीमुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. तालुक्यात तब्बल 146.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात 24 तासात 13 मंडळांत अतिवृष्टी झाली. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभरात किनवट, माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीला पूर आला होता. किनवट तालुक्यातील नालागड्डा, मोमीनपुरा, गंगानगर व रामनगरच्या 80 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील 176 गावांत 13 हजार 246 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यात काही भागात तुफान पाऊस होत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पुढील पाचही दिवस अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर आणि ठाण्यासाठी आजही ऑरेंज अलर्ट कायम आहे. अमरावती, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, जळगावसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, साताऱ्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.