Anil Bonde : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार वाद पेटला आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल तर भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून केली होती. ही टीका शिंदे गटाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली. दुसरीकडे आज उल्हासनगरात शिंदे गटाला डिवचणारे फलक भाजप कार्यकर्त्यांनी लावले. यानंतर भाजपकडूनही डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे भाजपचे खासदार अनिल बोंडेही आता नरमले आहेत.
खासदार बोंडे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप-शिवसेनेमध्ये सलोख्याचं, समन्वयाचं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. आता फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा भारताचे पंतप्रधान बनवणे. मोदींनी भारताच्या अमृतकाळाचं नेतृत्व करून भारताला नंबर एक राष्ट्र बनविण्याचा संकल्प आम्ही करत आहोत.
‘CM शिंदेंची माफी मागा, अन्यथा…’; बच्चू कडूंचा भाजप खासदाराला ‘लायकी’ ओळखण्याचा सल्ला
ते पुढे म्हणाले, आमच्या डोळ्यांसमोर सध्या लोकसभेची निवडणूक आहे. संपर्क अभियानाच्या माध्यमातून मागील नऊ वर्षात मोदी सरकारने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सध्या केले जात आहे.
काय म्हणाले होते बोंडे ?
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीची माहिती देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागला आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही.
माफी मागा, अन्यथा परिणाम भोगा – कडू
बोंडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल असे वक्तव्य केल्याने शिवसेनेचे सहकारी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू देखील संतापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची खासदार अनिल बोंडे यांची लायकी नाही. त्यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे. बोंडेंनी बेडकाची उपमा देऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली, त्याचा आम्ही निषेध करतो. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल. भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत अन्यथा आम्ही योग्य उत्तर देऊ.
शिंदे यांनी उठाव केला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मंत्री होता आले नसते. अजूनही काहीच सांगता येत नाही. बोंडे यांनी जे वक्तव्य केले आहे त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे. नाहीतर या टीकेचे परिणाम भाजपाच्या नेत्यांना भोगावे लागतील, असा इशारा कडू यांनी दिला होता.