‘CM शिंदेंची माफी मागा, अन्यथा…’; बच्चू कडूंचा भाजप खासदाराला ‘लायकी’ ओळखण्याचा सल्ला
Bacchu Kadu replies Anil Bonde :
देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही कायम आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करत “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते चांगलेच खवळले. आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बाळासाहेब नसते तर भाजपाची काय औकात होती? असा सवाल केला होता. त्यानंतर आता शिवसेनेचे सहयोगी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही खासदार बोंडे यांना इशारा दिला आहे.
Shinde VS Fadanvis : शिंदे- फडणवीस एकाच मंचावर; जाहिरात वादानंतरची नाराजी समोर येणार?
बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची खासदार अनिल बोंडे यांची लायकी नाही. त्यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे. बोंडेंनी बेडकाची उपमा देऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली, त्याचा आम्ही निषेध करतो. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल. भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत अन्यथा आम्ही योग्य उत्तर देऊ असा इशारा कडू यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, शिंदे यांनी उठाव केला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मंत्री होता आले नसते. अजूनही काहीच सांगता येत नाही. बोंडे यांनी जे वक्तव्य केले आहे त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे. नाहीतर या टीकेचे परिणाम भाजपाच्या नेत्यांना भोगावे लागतील.
जाहिरात आली, मुख्यमंत्र्यांना भेटलो पण, त्यांनी मला.. महाजनांनी सगळा घटनाक्रमच सांगितला
दरम्यान, बोंडे यांनी केलेली टीका शिंदे गटाच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. याआधी आमदार संजय गायकवाड यांनीही भाजपवर टीका करत त्यांची औकात काढली होती. बाळासाहेब नसते तर भाजपाची राज्यात काय औकात होती, असा जळजळीत सवाल गायकवाड यांनी विचारला होता.