Download App

राज्यात थंडीचा कडाका वाढला, काही दिवस पारा आणखी घसरणार

मुंबई : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. याच शेती पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा आणखीच घसरलाय. त्यामुळं थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय. गारठा वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

आजपासून (दि. 21) संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दुपारच्या अधिक प्रमाणात तापमानामध्ये घट होवून ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार आजपासून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. आजपासून थंडीमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. डिसेंबरच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळं राज्यात थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी वाढू लागलीय.

पुढील 10 दिवस राज्यात गारठा चांगलाच वाढणार आहे. ही थंडी 31 डिसेंबरपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय. बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळं नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत.

Tags

follow us