‘Maharashtra’s National wrestler jumps from Naldurg Fort with three children : ‘महाराष्ट्राची वाघीण’ आयुष्याचा डाव हरली! राष्ट्रीय कुस्तीपटूची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; धाराशिवमधील हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आलीय. राष्ट्रीय स्तरावरील नामांकित महिला कुस्तीपटूने आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून तब्बल 100 फूट खोल दरीत उडी घेत जीवन संपवलं. या दुर्दैवी घटनेत कुस्तीपटू महिला आणि तिचा साडेपाच वर्षांचा मुलगा जागीच मरण पावला, तर उपचारादरम्यान एका चिमुरडीचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
नळदुर्ग किल्ल्यावर नक्की काय घडलं? – उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय अश्विनी मनोहर पौळ (माहेरचे नाव अश्विनी मोहिते) या आपल्या मोठ्या मुलासह आणि अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. मुलांसोबत किल्ल्यावर येताना त्यांनी एक केक आणला होता. गडावर जाऊन केक कापण्याचे ठरले होते, मात्र सुरक्षा रक्षकाने आत केक नेण्यास मज्जाव केल्याने त्यांनी प्रवेशद्वाराजवळच हा केक कापला. हा वाढदिवस नेमका कोणाचा होता? हे समजू शकले नाही. यानंतर किल्ल्याच्या अत्यंत उंच बुरुजावरून किंवा तटबंदीवरून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांसह खाली दरीत उडी घेतली. या भीषण आवाजाने स्थानिक नागरिक व सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली, परंतु तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता.
विद्यानंद बापटांना शरद पवारांचं समर्थन; बापटांवर झालेल्या हल्ल्याचा पवारांनी केला निषेध
कुस्ती जगतातील ‘महाराष्ट्राची वाघीण’ – अश्विनी पौळ या केवळ एक खेळाडू नव्हत्या, तर त्यांना कुस्ती क्षेत्रात ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते. शालेय जीवनापासूनच कुस्तीच्या मैदानात उतरलेल्या अश्विनी यांना कुटुंबाकडूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले होते. वडिलांनी मुलीच्या सरावासाठी घरातच तालीम सुरू केली होती. त्यांनी आपल्या चमकदार कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके पटकावून राज्याचा व देशाचा गौरव वाढवला होता. 2007मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरमसह 2008 आणि 2009 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदकांची उल्लेखनीय कामगिरी केली होती. महाराष्ट्र सुरक्षा दलातही त्यांनी काही काळ सेवा बजावली होती. मात्र, असा हा जिगरबाज खेळाडू आयुष्याच्या संघर्षात नेमका का हरला? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहेरच्या मंडळींचे गंभीर आरोप – या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, अश्विनी यांच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. पती मनोहर पौळ हे पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील होते. गेल्या 3 महिन्यांपासून अश्विनी या मुलांसह माहेरी राहत होत्या. पती आणि सासरच्या लोकांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा वडिलांनी केलाय. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहांचे शवविच्छेदन केले असून, कौटुंबिक वाद, मानसिक तणाव व इतर सर्व बाजूने कसून तपास सुरू आहे.
सोलापुरात डीजेबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
चिमुकल्यांचा मृत्यू आणि सुरू असलेली झुंज – या हृदयद्रावक दुर्घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी चिमुरडी वीरा हिची प्रकृती अत्यंत गंभीर असून, धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ती व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने व्हंताळ गावावर आणि संपूर्ण क्रीडा वर्तुळावर शोककळा पसरलीय.
