धाराशिव-बीड-लातूरमधून नव्या चेहऱ्याला संधी; काँग्रेसकडून ‘या’ नावाची घोषणा

अद्याप भाजपचा उमेदवार ठरला नसल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटली आहे.

News Photo   2026 05 31T151920.455

धाराशिव-बीड-लातूरमधून नव्या चेहऱ्याला संधी; काँग्रेसकडून 'या' नावाची घोषणा

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी (Election) अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलं आहे. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला आहे. धाराशिव-बीड-लातूरमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.

धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी तीन वेळा विजया मिळवला होता. आता या मतदारसंघातून काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महेश देशमुख उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसला सुटली होती. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुतीचा विधान परिषद निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

धाराशिव जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहता याठिकाणी महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं याठिकाणी महायुतीमधून पुन्हा भाजपला उमेदवारीची संधी मिळणार आहे. धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात एकूण 904 मते आहेत. त्यामध्ये भाजप 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असं एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत.

त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. अद्याप भाजपचा (BJP) उमेदवार ठरला नसल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटली आहे. त्यांच्याकडून चार नेत्यांची नावं दिल्लीत पाठवण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी मंत्री व लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष बसवराज पाटील, धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर व बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक व विश्वासू सहकारी ओमप्रकाश शेटे या चार जणांची नावं आहेत. या नावापैकी एकाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version