महायुतीचा विधान परिषद निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि जागांवरील रस्सीखेचीनंतर अखेर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 17 जागांबाबत एकमत झाले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 15 2

Mahayuti’s formula for Legislative Council elections has been decided : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि जागांवरील रस्सीखेचीनंतर अखेर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 17 जागांबाबत एकमत झाले आहे. या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वाच्या बैठका, तसेच महायुतीतील समन्वयकांच्या चर्चेनंतर या जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे अतिरिक्त एक जागा आपल्या वाट्याला आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. दुसरीकडे सात जागांवर दावा करणाऱ्या शिवसेनेला अखेरीस चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या मतदारसंघातील अनेक आमदारांचा कार्यकाळ सम्पल्यानंतर देखील निवडणूक होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्त होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील किमान 75 टक्के मतदारसंख्या उपलब्ध असल्यास निवडणूक घेण्याची तरतूद आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येतात.

सरकारसोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मागे घेतलं उपोषण, कोणकोणत्या मागण्या झाल्या मान्य?

यंदाच्या निवडणुकीत सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांतील जागांवर लक्ष लागले आहे.

महायुतीच्या जागावाटपानुसार भाजप सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा आणि नांदेड या 11 जागांवर उमेदवार देणार आहे. शिवसेनेकडे ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या चार जागा गेल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि कोकण म्हणजे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे.

याआधी या जागांवर विविध पक्षांचे आमदार निवडून आले होते. भाजपकडे सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड आणि नागपूर या जागा होत्या. शिवसेनेकडे ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या जागा होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अहिल्यानगर, पुणे आणि कोकण या जागा होत्या. काँग्रेसकडे सांगली-सातारा आणि नांदेड या दोन जागा होत्या. यावेळी मात्र महायुतीने काँग्रेसच्या ताब्यातील दोन्ही जागांवरही दावा केला आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडेल आणि 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याने आता सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या नावांकडे लागले असून अनेक मतदारसंघांत इच्छुकांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः अहिल्यानगर, नांदेड, सांगली-सातारा आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते.

follow us