Mahesh Landge : मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून ही प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडला स्पोर्ट्स हब बनवण्याचा संकल्प भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी केला होता. त्याअनुशंगाने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते या प्रकल्पासाठी प्रशासनाकडे पाठपुरवठा करत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मौजे मोशी येथे गट क्र. 442 पै. व गट क्र. 445 पै मध्ये मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्र. 1/204 मध्ये स्टेडिअमचे प्रयोजन आहे.
सदर ठिकाणी बहुउद्देशीय क्रिडा संकुल उभारण्याबाबत महापालिका सभा क्र. 391 मध्ये दि. 25 जुलै 2023 रोजी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. प्रस्तावित ठिकाणी 4.56 हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित आहे. त्या ठिकाणी स्टेडिअम होणार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक भूखंड महाराष्ट्र क्रिकेट असोशिएन (MCA) मार्फत विकसित करुन चांगल्या प्रकारचा स्पोर्ट्स क्लब शहराला उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये इंटरनॅशनल मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित होणार आहे.
क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल व जलतरण खेळासाठी व खेळाडुंना या कॉम्प्लेक्सचा फायदा होणार आहे. याच बरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस कायमस्वरुपी मिळकतकर उपलब्ध होणार आहे. सदर प्रकल्प ‘‘बांधा, अर्थपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा’’ तत्त्वावर सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे (PPP) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा या प्रकल्पावर खर्च होणार नसल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे.
याबाबत बोलताना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘भोसरी व्हिजन – 2020 ’ मध्ये आम्ही पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्पोर्ट्स सिटी’ बनवण्याचा संकल्प केला होता आणि त्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्र, आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, इंटरनॅशनल बॉक्सिंग सेंटर, स्केटिंग ग्राउंड असे विविध प्रकल्प आतापर्यंत आम्ही मार्गी लावले आहे आणि पुढील काळात पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्याचा आमचा मानस आहे असेही यावेळी ते म्हणाले.
सोनम कपूर पॅरिसमध्ये क्रिश्चियन डिओर स्प्रिंग-समर 2025 वीमेंसवियर शोमध्ये चमकली
तसेच स्पोर्ट्स क्लबचे नियोजन नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडिअममध्ये करण्यात येत आहे आणि मोशी येथे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूलसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प उभारणी सुरु करावी आणि राज्यातील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचीही पायाभरणी करावी अशी अपेक्षा आहे. असं देखील यावेळी ते म्हणाले.