Download App

युद्धग्रस्त पोलंडवासियांना आश्रय देणारं कोल्हापूर; PM मोदींच्या दौऱ्यानं इतिहासाला उजाळा..

कोल्हापुरातील राजघराण्यानं पोलंडच्या महिला आणि मुलांना वळीवडे या गावात आश्रय दिला होता असे पीएम मोदी पोलंड दौऱ्यात म्हणाले.

PM Modi in Poland : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या (PM Modi in Poland) दौऱ्यावर आहेत. येथील भारतीय नागरिकांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मोदींनी त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. यावेळी इतिहासातील अशी एक गोष्ट सांगितली जी ऐकून प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच वाटेल. पीएम मोदींनी अस्खलित मराठीत उपस्थितांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, कोल्हापुरातील राजघराण्यानं पोलंडच्या महिला आणि मुलांना वळीवडे या गावात आश्रय दिला होता. या लोकांना कोणताही त्रास होऊ नये याची दिवसरात्र काळजी येथील लोकांनी घेतली.. आता मोदींचे हे शब्द ऐकल्यानंतर मनात नक्कीच विचार येतो की युरोपातील लहानसा देश पोलंड अन् त्याचं महाराष्ट्राशी असं काय कनेक्शन असू शकतं? तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू या..

या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागं जावं लागेल. 1944 मधील दुसऱ्या महायुद्धाचा काळ आठवा. या युद्धाचे सर्वाधिक चटके पोलंडला बसले. रशियाच्या लष्करानं पोलंडवर हल्ला करून पोलिश नागरिकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावलं. लाखो नागरिकांना त्यांच्याच देशातून परागंदा व्हावं लागलं. युद्धाचे सर्वाधिक चटके महिला आणि लहान मुलांना बसतात. येथेही तेच झालं. पोलीश महिला आणि मुलांचे अतोनात हाल झाले. युद्धाच्या प्रसंगात कोण मदत करील याची काहीच शाश्वती नव्हती. निर्वासितांची सोय करा अशी विनवणी पोलंड सरकारने जगभरातील देशांना केली.

95 वर्षीय आज्जीनं पोलंडमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून रचला इतिहास

या संकटाच्या काळात भारतातून मदतीचा आवाज आला. गुजरात राज्यातील जामनगरच्या बालाचडी आणि महाराष्ट्रातील करवीर संस्थानाने या नागरिकांना आधार देण्याची तयारी केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी या नागरिकांना कोल्हापुरात आश्रय दिला. निर्वासितांच्या राहण्याची व्यवस्था केली. तब्बल पाच वर्षे हे लोक वळीवडे या गावात वास्तव्यास होते.

जामनगर संस्थानने एक हजार पोलीश नागरिकांना आश्रय दिला होता तर कोल्हापूर संस्थानाने जवळपास सहा हजार निर्वासितांना आश्रय दिला. कोल्हापूरपासून आठ किलोमीटर अंतरावरचं वळिवडे गाव. या गावातच या निर्वासितांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 1943 ते 1948 या पाच वर्षांच्या काळात पोलंडमधील नागरिक या गावात राहिले. संकटात कुणीही असो त्याची मदत करणं आपलं कर्तव्य हा भाव महाराष्ट्रवासियांनी जपला. गावात छावणी उभारण्यात आली. घर, शाळा, दुकानं, प्रार्थनास्थळे, महाविद्यालयांची व्यवस्था करण्यात आली.

दैनंदिन वस्तू उपलब्ध होण्यासाठी येथे आठवडी बाजारही भरवला जायचा. आपल्या येथे आलेल्या या नागरिकांना कोणताच त्रास होऊ नये याची काळजी येथील लोकांनी घेतली. याच भावनेपोटी ज्यावेळी 2019 आणि 2021 मध्ये वळिवडे गावाला पुराचा फटका बसला तेव्हा पोलंडच्या नागरिकांनी गावाला आर्थिक मदत केली होती. दुसरं महायुद्ध संपण्याच्या बेतात आल्यानंतर या निर्वासितांना पुन्हा मायदेशी रवानगीचे सरकारी फर्मान निघाले. विमानाने सर्व नागरिक त्यांच्या देशात निघून गेले. या नागरिकांसाठी समाधानाची एकच गोष्ट होती ती म्हणजे या नागरिकांना पुन्हा त्यांचा देश सोडून पलायन करावं लागलं नाही.

रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय?

भारत ही पवित्र भूमी आहे. या भूमित वास्तव्यास असताना मी 11 वर्षांची होते. आईने माझ्या हातात घातलेल्या दोन बांगड्या आजही आहेत. कोल्हापूरमधील ही आठवण आजही माझ्यासोबत आहे अशी भावना वळीवडे गावातील छावणीत राहिलेल्या लुडमिला जॅक्टोव्हिझ व्यक्त करतात.

follow us